उन्हाळ्याचे कडकडीत, रणरणते ऊन पडू लागले की, घरांच्या गच्चीवर किंवा अंगणात पांढऱ्याशुभ्र कापडावर वाळत घातलेले वाळवणाचे अनेक पदार्थ घरोघरी दिसू लागतात. वर्षभरासाठी टिकणारे, चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ तयार करण्याची हीच योग्य वेळ असते. वाळवणाच्या विविध पारंपरिक पदार्थांमध्ये पापड, लोणची, चटण्या, सांडगी मिरच्या, मुरंबा असे अनेक पदार्थ केले जातात. परंतु अशाच पारंपरिक वाळवणांपैकी एक खास पदार्थ म्हणजे मिश्र डाळींचे पौष्टिक सांडगे... विविध डाळींचा एकत्रित वापर केला असल्यामुळे हे सांडगे केवळ चवीलाच नव्हे तर आरोग्यासाठीही अत्यंत पौष्टिक ठरतात(Mishra Dalinche Sandge Recipe).
कुरकुरीत, मसालेदार आणि दीर्घकाळ टिकणारे हे सांडगे कोणत्याही भाजीसोबत किंवा तळून खायला अतिशय स्वादिष्ट लागतात. कधी घरात भाजीला काही नसेल किंवा डाळ-भातासोबत काहीतरी कुरकुरीत तोंडी लावायला हवे असेल, तर हे सांडगे अगदी उत्तम पर्याय ठरतात. मटकी, चणा, मूग आणि उडीद अशा विविध डाळींचे मिश्रण, त्यात घातलेला लसूण, जिरं आणि तिखटाचा ठसका यामुळे या सांडग्यांचा सुगंध घरभर दरवळतो. उन्हात नीट वाळवलेले हे सांडगे वर्षभर अगदी (How To Make Mishra Dalinche Sandge) आरामात टिकतात. योग्य प्रमाण वापरून खुसखुशीत आणि चविष्ट मिश्र डाळींचे सांडगे घरच्याघरीच सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे याची पारंपरिक रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. पिवळी मूग डाळ - १ कप २. मटकीची डाळ - १ कप ३. उडीदाची डाळ - १ कप ४. चणा डाळ - १ कप ५. लसूण पाकळ्या - ५ ते ८ पाकळ्या६. मीठ - चवीनुसार७. हळद - १ टेबलस्पून ८. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून ९. धणेपूड - १ टेबलस्पून १०. जिरेपूड - १ टेबलस्पून ११. ओवा - १ टेबलस्पून १२. कोथिंबीर - २ ते ३ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
अर्धा उरलेला नारळ उन्हाळ्यातही राहील एकदम फ्रेश! फ्रिजशिवाय १० दिवस टिकवण्याच्या खास घरगुती टिप्स...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये पिवळी मूग डाळ, मटकीची डाळ, उडीदाची डाळ एकत्रित घेऊन पाण्याने ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्या. मग यात पुरेसे पाणी घालून डाळ ५ ते ६ तास पाण्यांत व्यवस्थित भिजवून घ्या. २. दुसऱ्या एका वेगळ्या बाऊलमध्ये चणा डाळ घेऊन ती स्वच्छ धुवून पाण्यांत वेगळी भिजत घाला. ३. सगळ्या डाळीमधील पाणी पूर्णपणे निथळून मग मिक्सरच्या भांड्यात या सगळ्या डाळी आणि लसूण पाकळ्या एकत्रित वाटून त्याची थोडी मध्यम जाडसर अशी भरड तयार करून घ्यावी.
४. मिक्सरमध्ये वाटून घेतलेली ही भरड एका बाऊलमध्ये काढून त्यात चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट मसाला, धणेपूड, जिरेपूड, ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. ५. एका स्वच्छ सुती कापडावर तयार मिश्रणाचे छोटे - छोटे सांडगे घालून ते पुढील ३ ते ४ दिवस पूर्णपणे सुकेपर्यंत उन्हांत वाळवून घ्यावेत.
संपूर्णपणे वाळवून घेतलेले सांडगे हवाबंद डब्यांत भरुन वर्षभरासाठी स्टोअर करुन ठेवावे.
Web Summary : Make nutritious mixed dal sandge at home this summer! This traditional recipe uses various lentils and spices, offering a delicious and healthy snack or side dish that lasts all year. Learn the easy method to prepare it.
Web Summary : इस गर्मी में घर पर पौष्टिक मिश्रित दाल के सांडगे बनाएं! इस पारंपरिक रेसिपी में विभिन्न दालों और मसालों का उपयोग किया गया है, जो एक स्वादिष्ट और स्वस्थ नाश्ता या साइड डिश प्रदान करते हैं जो पूरे साल चलता है। इसे बनाने का आसान तरीका जानें।