Join us

कशाला हवेत महागडे कोल्ड ड्रिंक्स? १५ रुपयांत घरीच करा 'मिंट मोइतो क्युब्ज', महिनाभर घ्या आस्वाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2025 17:17 IST

Mint Mojito Cubes Recipe: उन्हाच्या झळा सुरु होऊ लागल्या की गारेगार सरबत प्यावेसे वाटते, तेव्हा विकतचे कोल्ड ड्रिंक्स पिण्यापेक्षा ते घरीच बनवा आणि आस्वाद घ्या. 

पूर्वी होळीपर्यंत थंडीची ये जा सुरु असे, पण आता वाढत्या तपमानामुळे जानेवारी अखेरीलाच उन्हाचे तडाखे सुरु झाले आहेत. मे-जून पर्यंत काय परिस्थिती येईल याची कल्पनाच न केलेली बरी! पण उन्हाळ्यावर मात करण्यासाठी अनेक चटपटीत उपायही आहेत, त्यांचा वापर करून तो सुसह्य बनवता येतो. पूर्वी लिंबू, पुदिन्याचे सरबत हातगाडीवर मिळत असे. आताही मिळते, पण त्यातील भेसळ नजरेस आल्यामुळे आपण ते घेणे टाळतो. आता मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाऊन लोक महागडे सॉफ्ट ड्रिंक्स घेतात, ज्याला मोइतो, मोजितो, मोहितो वगैरे ग्लॅमरस नावांनी ओळखतात. मात्र रेसेपी काही वेगळी नसून ते असते साधे लिंबू-पुदिना सरबत. जे घरच्या घरी बनवता येते आणि एकदा बनवले की महिनाभर टिकवताही येते. कसे ते जाणून घेऊ. 

असे अनेक पुदिना प्रेमी आहेत, ज्यांना बाजारात पुदिन्याची ताजी गड्डी दिसली, की विकत घेण्याचा मोह होतोच. पण विकत आणल्यावर तो पूर्ण वापरला जातोच असे नाही. दर वेळी विकत आणून तो वाया घालवणे पटत नाही. त्यावर उपाय म्हणजे 'मिंट क्युब्स' अर्थात पुदिन्याचा बर्फ. तो घरच्या घरी बनवताही येतो आणि महिनाभर वापरताही येतो. फक्त तो बनवताना काही चुका टाळायला पाहिजे. चला तर बनवूया 'मिंट मोइतो क्युब्स.'

साहित्य : पुदिना, मिरची, लिंबाचा रस, काळे मीठ, पाणी, आईस ट्रे 

कृती : - सर्वप्रथम पुदिन्याची पाने निवडून घ्या. देठं घेऊ नका. - पुदिना हिरवागार असतानाच त्याचा वापर करा, जेणेकरून दीर्घकाळ चव टिकून राहील. - वाटीभर पुदिना असेल तर चार ते पाच मिरच्या घ्या. - दोन चमचे लिंबाचा रस घ्या. - चवीनुसार काळे मीठ घाला. - सगळे जिन्नस मिक्सरमध्ये दोन चमचे पाणी टाकून वाटून घ्या. - फार पातळ होऊ न देता दाटसर पेस्ट बनवून घ्या. - हे मिश्रण आईस ट्रेमध्ये भरून घ्या आणि फ्रिजरमध्ये गार करायला ठेवा. - चार तासांनी तयार झालेले मिंट क्युब्स हवाबंद डब्यात किंवा झिप लॉक पिशवीत काढून घ्या आणि ती पिशवी फ्रिजरमध्ये ठेवा. - पुदिना चटणी, पाणीपुरीचे पाणी, पुदिना पराठा किंवा बिर्याणी करतानाही क्युब्स बाहेर काढून ठेवले तरी पुदिना लिक्विड फॉर्ममध्ये कशातही वापरता येईल. 

मिंट मोइतो कृती :

- मोइतो प्यावेसे वाटेल तेव्हा फ्रिजरमधून मिंट क्युब्स बाहेर काढा. - एका ग्लास मध्ये चवीनुसार एक किंवा दोन क्युब्स घाला. - एकी चमचा पिठीसाखर घाला. - स्प्राईट किंवा इतर कोणताही सोडा घाला. - डेकोरेशनसाठी पुदिन्याची ताजी पाने घाला आणि लिंबाची चकती लावून सर्व्ह करा. 

टॅग्स :समर स्पेशलअन्नहोम रेमेडीपाककृती