हिवाळ्याच्या ऋतूंत बाजारांत फार मोठ्या प्रमाणावर हिरव्यागार आणि ताज्या भाज्या अगदी सहज विकत मिळतात. या दिवसात लहान, कोवळ्या, हिरव्यागार पानांची सुवासिक मेथी प्रत्येक घरोघर हमखास फार मोठ्या प्रमाणावर विकत आणली जाते. मेथी विकत आणताच त्याचे वेगवेगळे पदार्थ घरच्याघरीच तयार केले जातात. मेथीचा पराठा, मेथीची भाजी असे पदार्थ तर आपण खातोच. परंतु नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं खावंसं वाटलं तर आपण मेथीची खुसखुशीत, कुरकुरीत अशी खमंग वडी देखील तयार करु शकतो. मेथीचा हलका कडवटपणा आणि बेसन-मसाल्यांचा खमंगपणा जेव्हा एकत्र येतो, तेव्हा तयार होणारी ही वडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मनापासून आवडते. विशेषतः हिवाळ्यात ताजी मेथी असताना हा पदार्थ हमखास केला जातो(methi vadi recipe).
जेवणासोबतची साइड डिश किंवा चहाबरोबर खाण्यासाठी मेथी वडी अप्रतिम लागते. मेथी वडी केवळ चवीलाच उत्कृष्ट नसते, तर ती आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. मेथीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि लोह असते, जे पचन सुधारण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. अनेकदा मुले मेथीची भाजी खायला कंटाळा करतात, अशा वेळी त्यांना ही पौष्टिक वडी खायला देणे एक स्मार्ट युक्ती ठरू शकते. घरात अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या कमी साहित्यात, इन्स्टंट पद्धतीने तयार होणारी ही रेसिपी प्रत्येकाच्या आवडीची ठरते. घरच्याघरी खमंग आणि परफेक्ट ( How To Make Methi Vadi At Home) मेथी वडी कशी तयार करायची याची रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. आलं - १ इंचाचा (छोटा तुकडा)
२. लसूण पाकळ्या - ६ ते ८ पाकळ्या
३. हिरव्या मिरच्या - ४ ते ६ मिरच्या
४. कोथिंबीर - १ कप
५. बेसन – २ कप
६. तांदुळाचे पीठ - ४ टेबलस्पून
७. हळद - १/२ टेबलस्पून
८. हिंग - १/२ टेबलस्पून
९. धणेपूड - १ टेबलस्पून
१०. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
११. जिरेपूड - १/२ टेबलस्पून
१२. तीळ - १/२ टेबलस्पून
१३. ओवा - १/२ टेबलस्पून
१४. चिरलेली मेथी - २ कप
१५. मीठ - चवीनुसार
१६. तेल - २ टेबलस्पून
१७. पाणी - गरजेनुसार २ ते ३ टेबलस्पून
पनीरची अशी भाजी कधीच खाल्ली नसेल! हॉटेलची चव विसराल जेव्हा घरीच कराल झणझणीत 'पनीर खिमा मसाला'...
कृती :-
१. एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात आल्याचा छोटा तुकडा, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सगळे जिन्नस एकत्रित वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी.
२. एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन, तांदुळाचे पीठ, हळद, हिंग, धणेपूड, लाल तिखट मसाला, जिरेपूड, तीळ, ओवा, चिरलेली मेथी, मीठ तेल व गरजेनुसार पाणी घालावे.
३. सगळे जिन्नस एकत्रित कालवून त्याचे पीठ मळून घ्यावे.
४. मळून घेतलेल्या पिठाचे रोल तयार करून ते प्रेशर कुकरमध्ये किंवा कढईत पाणी ठेवून त्यावर तयार रोल ठेवून १० ते १५ मिनिटे वाफवून घ्यावे.
५. वाफवून घेतल्यावर याच्या गोलाकार छोट्या - छोट्या वड्या पाडून त्या गरम तेलात खरपूस तळून घ्याव्यात.
गरमागरम, कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी खमंग चवीची मेथी वडी खाण्यासाठी तयार आहे. सॉस किंवा हिरव्या चटणी सोबत ही मेथी वडी खायला अधिकच चविष्ट लागते.
