थंडीचा सिझन सुरू झाला की बाजारात हिरवेगार, टपोरे आणि गोड मटार दाणे विकायला ठेवलेले दिसू लागतात. आजकाल तर अगदी वर्षभर मटारचे दाणे विकत मिळतात, परंतु या गुलाबी थंडीच्या दिवसात येणाऱ्या हिरव्यागार मटारची चव तर काही औरच असते...विशेष करून हिवाळयात मिळणाऱ्या या हिरव्यागार टपोऱ्या मटार दाण्यांचे अनेक पदार्थ घरोघरी हमखास केले जातात. भाजी, पुलाव, मटार करंजी असे मटारचे असंख्य पदार्थ तयार करून खाण्याचा मोह आवरता येत नाही(Green Peas Vada Recipe).
गुलाबी थंडीच्या वातावरणात संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी खुसखुशीत, कुरकुरीत आणि चमचमीत खाण्याची इच्छा होतेच. अशा वेळी, या ताज्या मटारांपासून तयार केलेले गरमागरम वडे (Matar Vada) हा एक उत्तम आणि चमचमीत, चटपटीत पदार्थ...हे वडे आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत असल्याने सगळ्यांनाच आवडतात... हा पदार्थ तयार करायला खूप सोपा आहे आणि नेहमीच्या वड्यांपेक्षा याची चव एकदम वेगळी आणि हटके लागते. गुलाबी थंडीची मजा द्विगुणित करणारी, मस्त हिरव्यागार मटारचे (matar vada recipe) खुसखुशीत वडे तयार करण्याची सोपी आणि झटपट रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१.मटार दाणे - १.५ कप (उकडलेले मटार दाणे)
२. आलं - १ छोटा तुकडा
३. हिरव्या मिरच्या - २ ते ३ मिरच्या
४. लसूण पाकळ्या - ६ ते ७ पाकळ्या
५. जिरं - १ टेबलस्पून
६. मोहरी - १/२ टेबलस्पून
७. तेल - तळण्यासाठी
८. कडीपत्ता - ३ ते ५ पाने
९. हिंग - १/२ टेबलस्पून
१०. धणे - २ टेबलस्पून
११. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)
१२. बटाटा - १ कप (उकडवून कुस्करून घेतलेला)
१३. हळद - १ टेबलस्पून
१४. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून
१५. गरम मसाला - १ टेबलस्पून
१६. मीठ - चवीनुसार
१७. बेसन - १.५ कप
१८. बेकिंग सोडा - १/२ टेबलस्पून
१९. पाणी - गरजेनुसार
कृती :-
१. मटार दाणे आणि बटाटा उकडवून घ्या.
२. मिक्सरच्या मोठ्या भांड्यात उकडलेले मटार दाणे, आल्याचा छोटा तुकडा, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, जिरं असे सगळे जिन्नस घालून एकत्रित वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी.
२. एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात मोहरी, कडीपत्ता, धणे, हिंग, बारीक चिरलेला कांदा, उकडवून कुस्करून घेतलेला बटाटा, मटारचे मिक्सरमध्ये वाटून घेतल मिश्रण घालावे.
हिरव्या मुगाचे लाडू म्हणजे लहानपणची सुंदर आठवण, आजीच्या काळातलं सुपरफूड-पाहा पारंपरिक रेसिपी...
३. मग या मिश्रणात हळद, गरम मसाला, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ घालावे. सगळे मिश्रण कालवून एकजीव करून घ्यावे.
४. ३ ते ४ मिनिटे हे मिश्रण व्यवस्थित कालवून एकजीव करून घ्यावे. २ मिनिटे हे मिश्रण मंद आचेवर व्यवस्थित शिजवून घ्यावे. तयार बॅटरचे छोटे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यावेत.
५. दुसऱ्या एका बाऊलमध्ये बेसन पीठ घेऊन त्यात गरजेनुसार पाणी, चवीनुसार मीठ, गरम मसाला, लाल तिखट मसाला, हळद, बेकिंग सोडा घालून मिश्रण कालवून वरच्या आवरणासाठी मध्यम कन्सिस्टंन्सीचे बॅटर तयार करून घ्यावेत.
६. तयार केलेले बॅटरचे गोलाकार वडे बेसनाच्या बॅटरमध्ये घोळवून गरम तेलात सोडून खरपूस असे तळून घ्यावेत.
मस्त गरमागरम हिरव्यागार मटारचे चविष्ट, चटपटीत वडे खाण्यासाठी तयार आहेत. लसूण किंवा शेंगदाण्याच्या झणझणीत चटणीसोबत हा मटार वडा खायला अप्रतिम लागतो.
