हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत गरमागरम आणि खुसखुशीत पदार्थांची मेजवानी म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. त्यातही बाजारात ताजे, रसरशीत, हिरवेगार आणि गोड मटार दाणे दिसू लागले की, आपण मोठ्या हौसेनं ते विकत घेतो. एकदा का मटार दाणे विकत आणले की घरात रोज मटारचे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. मटार दाण्यांच्या वेगवेगळ्या पदार्थांपैकी मटारची खमंग, खुसखुशीत कचोरी म्हणजे घरातील लहानांपासून मोठ्यांचा आवडता पदार्थ... बाहेरून कुरकुरीत आणि आतून मटारच्या चटपटीत सारणाने भरलेली ही कचोरी म्हणजे हिवाळ्यातील स्पेशल पदार्थ... सकाळच्या नाश्त्यापासून ते संध्याकाळच्या चहासोबत किंवा पाहुण्यांसाठी खास पदार्थ म्हणून मटार कचोरी परफेक्ट पदार्थ ठरतो(how to make matar kachori at home).
कमी वेळात तयार होणारी, स्वादिष्ट आणि पोटभरीचा पदार्थ म्हणून ही रेसिपी थंडीच्या दिवसांत खासच लागते. बाहेर थंडीचा तडाखा आणि हातात वाफाळलेली मटार कचोरी... दुसरं काय हवं! वरून सोन्यासारखा पिवळसर हलका रंग, कुरकुरीत - खुसखुशीत पापुद्रा आणि आतून आल-लसूण-मिरचीच्या ठसक्यातील मटारचे सारण अशी ही चमचमीत (easy matar kachori recipe) चवीची कचोरी म्हणजे हिवाळ्यातील सुख...हलवायाच्या दुकानासारखी परफेक्ट कचोरी घरच्याघरीच तयार करण्यासाठी सोपी रेसिपी पाहूयात..
साहित्य :-
१. मटार दाणे - १ कप
२. आलं - २ छोटे तुकडे
३. लसूण पाकळ्या - १० ते १२ पाकळ्या
४. हिरव्या मिरच्या - ३ ते ४
५. मैदा - १ कप
६. तेल - २ ते ३ टेबलस्पून
७. ओवा - १/२ टेबलस्पून
८. पाणी - गरजेनुसार
९. जिरे - १ टेबलस्पून
१०. धणे - १ टेबलस्पून
११. बडीशेप - १ टेबलस्पून
१२. हिंग - १/२ टेबलस्पून
१३. बेसन - १ टेबलस्पून
१४. हळद - १/२ टेबलस्पून
१५. गरम मसाला - १ टेबलस्पून
१६. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
फक्कड मसाला चहा करण्याचं टपरीवाल्यांचं १ सिक्रेट, आलं-वेलची-चहामसाला, ‘असा’ करा मस्त चहा...
शिळ्या चपातीची वडी! कुरकुरीत मसालेदार वडी पाहून सगळे विचारतील रेसिपी, शिळ्या पोळ्यांचा चट्टामट्टा...
कृती :-
१. सगळ्यात आधी मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यात उकडवून घेतलेले मटार दाणे, आलं, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या घालून सगळे मिश्रण पाणी न घालता कोरडेच वाटून घ्यावे. मिश्रण थोडे जाडसर भरड होईल असेच करावे.
२. एका दुसऱ्या बाऊलमध्ये मैदा, तेल, ओवा एकत्रित घेऊन त्यात गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यावे. पीठ मळून झाल्यावर ते ५ ते १० मिनिटे झाकून ठेवावं.
३. एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात जिरे, धणे, बडीशेप, हिंग, बेसन घालून खमंग अशी फोडणी तयार करून घ्यावी. तयार फोडणीत मिक्सरमध्ये वाटून घेतलेली मटारची भरड घालून खरपूस आणि खमंग सुगंध येईपर्यंत परतवून घ्यावी. त्यानंतर त्यात चवीनुसार थोडं मीठ, हळद, गरम मसाला घालावा. सगळ्यात शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घ्यावी.
४. मळून घेतलेल्या मैद्याच्या पिठाचे मध्यम आकारचे गोळे तयार करून त्याची पुरी एवढ्या आकारची गोलाकार पारी लाटून घ्यावी.
५. या तयार गोलाकार मैद्याच्या पारीत मटारचे सारण भरुन त्याला गोलाकार आकार द्यावा.
६. कढईत तेल गरम करून त्यात या कचोऱ्या सोडून हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्याव्यात.
गरमागरम, खुसखुशीत मटार कचोऱ्या खाण्यासाठी तयार आहेत. हिरवीगार चटणी किंवा सॉससोबत देखील आपण या कचोऱ्या खाऊ शकता.
