Join us

गौरी-गणपतीच्या दिवसांत नैवेद्यासाठी करा चविष्ट पारंपरिक गोड आंबट पंचामृत; पुरणावरणाच्या स्वयंपाकात पंचामृत तर हवेच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2023 13:26 IST

Masala Panchamrut Traditional Recipe Gauri Ganpati Special : चिंच, गूळ आणि तिखट यांमुळे या पंचामृताला छान आंबट-गोड चव येते

गौरी-गणपती येणार म्हटल्यावर त्यांना वेगवेगळ्या चवीचे पदार्थ बनवून खायला घातले जातात. गौरी जेवणाच्या दिवशी तर घरोघरी पारंपरीक पदार्थांची मेजवानीच असते. नैवेद्याचे ताट म्हणजे त्यात लिंबाच्या फो़डीपासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, कोशिंबीरी, भाज्या, तळणाचे प्रकार, गोडाधोडाचे प्रकार हे सगळे ओघानेच आले. या प्रत्येक पदार्थाची एक वेगळी चव, रंगत आणि महत्त्व असते. एरवी आपण क्वचितच हे पदार्थ करतो पण नैवेद्याच्या पानासाठी मात्र पंचामृतासारखे पारंपरिक पदार्थ आवर्जून केले जातात (Masala Panchamrut Traditional Recipe Gauri Ganpati Special) . 

शेंगादाणे, खोबरं, तीळ, कडीपत्ता आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चिंच-गूळ वापरुन केलेले हे पंचामृत चवीला अतिशय छान लागते. वरण-भात किंवा आमटी-भातासोबत तोंडी लावण्यासाठी हे पंचामृत खूपच चविष्ट लागते. पुरणा-वरणाचा स्वयंपाक असला की हे पंचामृत आवर्जून केले जाते. दाणे, खोबरं आणि तीळ यांसारखे पदार्थ असल्याने आरोग्यासाठीही ते चांगले असते. चिंच, गूळ आणि तिखट यांमुळे या पंचामृताला छान आंबट-गोड चव येत असल्याने ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. हे पंचामृत शिजलेले असल्याने बरेच दिवस टिकते. त्यामुळे  किमान ८ दिवस तरी आपण पोळी, भात अशा सगळ्यासोबत हे पंचामृत खाऊ शकतो. याची रेसिपीही अतिशय सोपी असून अगदी १० मिनीटांत हे पंचामृत तयार होतं.  

(Image : Google)

१. कढईत २ चमचे तेल घेऊन त्यामध्ये मोहरी आणि जीरं घालायचं.  

२. मग यामध्ये अर्धा चमचा मेथ्या, अर्धी वाटी दाणे आणि अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घालायचे.

३. सगळ्यात शेवटी ८ ते १० कडीपत्त्याची पाने घालून हे सगळे चांगले परतून घ्यायचे. 

४. मग खलबत्त्यात चमचाभर धणे घेऊन ते चांगले कुटून घ्यायचे आणि ते कढईत घालायचे. 

५. मग यामध्ये अंदाजे तिखट, हळद, गोडा मसाला घालून सगळे पुन्हा एकत्र परतून घ्यायचे. 

६. मग यामध्ये चिंच आणि गुळ यांपासून केलेला चिंचेचा कोळ घालून सगळे चांगले एकजीव करायचे. 

७. मग त्यात दाण्याचा कूट, तीळ आणि हिंग, अंदाजे थोडं पाणी घालून चांगले शिजू द्यायचे.

८. सगळ्यात शेवटी यामध्ये शिजून जितके पंचामृत राहीले आहे त्याचा अंदाज घेऊन मीठ घालायचे.    

टॅग्स :गणेशोत्सवपाककृतीअन्नगणपतीगणेशोत्सव