बुंदीचा लाडू प्रसादासाठी तसेच एखाद्या खास क्षणी खाल्ला जातो. त्यातही अनेक प्रकार आहेत. ( make Bundi Laddu at home for Ganesh Chaturthi, see the easy method of making Bundi Laddu , sweet recipes )त्यापैकीच एक म्हणजे मऊ रसरशीत असा जिभेवर विरघळणारा बुंदीचा केशरी लाडू. बाजारात हा लाडू आरामात उपलब्ध होतो. मात्र त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. घरी छान असा बुंदीचा लाडू करायला एकदम सोपा आहे. एकदा ही पद्धत पाहा. अगदी मस्त होतो.
साहित्यबेसन, पाणी, बेकींग सोडा, साखर, खायचा केशरी रंग, वेलची पूड, तूप, भोपळ्याच्या बिया
कृती१. एका बारीक चाळणीत बेसन घ्या आणि ते चाळून घ्या. दोन वाटी बेसन घेत असाल तर त्यात एक ते दिड वाटी पाणी घालायचे. म्हणजे प्रमाण संतुलित राहील. बुंदी पाडणे तसे सोपे आहे. फक्त पाणी आणि बेसन योग्य प्रमाणात एकजीव करता आले पाहिजे. बेसनात पाणी घालून त्याचे पातळ असे मिश्रण तयार करायचे. त्यात थोडा बेकींग सोडा घालायचा. अति पातळ करायचे नाही. बुंदी पडत नाही.
२. गॅसवर तेल गरम करत ठेवायचे. तेल मस्त तापल्यावर त्यात गोल आकाराचे छिद्र असलेल्या कोणत्याही पात्राने बुंदी सोडायची. जर बुंदी करायचे साहित्य नसेल तर झारा वापरु शकता. तसेच जाड गोलांची चाळणी घरी असेल तर तिचा वापर करा.
३. एका पातेल्यात साखर घ्यायची. एक ते दोन वाटी साखर घ्यायची. तुम्हाला जसे गोड आवडे त्यानुसार प्रमाण घ्यायचे. साखर आणि पाणी घ्यायचे. दोन वाटी साखर असेल तर एक ते दिड वाटी पाणी लागते. साखरेचा एकतारी पाक तयार करायचा. छान पाक तयार झाल्यावर त्यात थोडी वेलची पूड घालायची. तसेच केशरी रंग घालायचा. रंग नाही घातला तरी चालेल. तयार बुंदी पाकात घालायची.
४. पाकात बुंदी मिक्स करायची. सतत ढवळायची. सगळा पाक बुंदीमधे मुरला पाहिजे. सगळा पाक मुरल्यावर ते मिश्रण गार होऊ द्या. मग त्यात भोपळ्याच्या बिया घाला. मिक्सरच्या भांड्यात मिश्रण घ्यायचे. ते पातळ वाटू नका. अगदी दोन सेकंदासाठी फिरवायचे. बुंदी मऊ करायची. मिक्सर नसेल वापरायचा तर हाताने कुसकरा किंवा कुटून घ्या.
५. मस्त मऊ लाडू वळून घ्या. आवडीनुसार सुकामेवाही त्यात घालू शकता. करायला एकदम सोपे आहेत. नक्की करुन पाहा.