Join us

मकर संक्रांत स्पेशल : करा फक्त १० मिनिटांत होणारी खमंग कुरकुरीत तिळपापडी, नेहमीच्या लाडूवड्यांपेक्षा सोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2024 15:22 IST

Makar Sankranti Easy Crispy Tilpapdi Recipe : तीळपापडी चवीलाही इतकी छान लागते की ती केली की लगेच फस्त होते.

मकर संक्रांत म्हटली की तीळगूळ ओघानेच आला. आरोग्यासाठी फायदेशीर असलेले हे खाद्य एकमेकांना देण्याची पद्धत आहे. थंडीच्या दिवसांत शरीरात उष्णता टिकून राहावी यासाठी तीळगूळ आवर्जून खाल्ले जातात. संक्रांतीला घरोघरी तीळगुळाच्या वड्या आणि लाडू केले जातात. गुळाची पोळी हा पदार्थही महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी संक्रांतीला आवर्जून केला जातो. पण यावेळी नेहमीपेक्षा थोडं वेगळं काही ट्राय करायचं असेल आणि रोजच्या धावपळीत हातात वेळही कमी असेल तर नेहमीच्या लाडू आणि वड्यांपेक्षा तीळाची पापडी हा थोडा आगळावेगळा आणि अतिशय चविष्ट असा प्रकार तुम्ही नक्की ट्राय करु शकता. अगदी १० मिनीटांत होणारी ही कुरकुरीत तीळपापडी चवीलाही इतकी छान लागते की ती केली की लगेच फस्त होते. पाहूयात ही गूळपापडी नेमकी कशी करायची (Makar Sankranti Easy Crispy Tilpapdi Recipe)...

१. सगळ्यात आधी ज्यावर तीळपापडी लाटायची आहे ते पोळपाट, ताट आणि लाटणं यावर तूप लावून ठेवायचे. 

२.  साधारण १ वाटी तीळ कढईत लहान आणि मध्यम आचेवर चांगले खरपूस भाजून घ्यायचे. 

(Image : Google)

३. मग हे तीळ एका ताटलीत काढून थंड होण्यासाठी ठेवावेत.

४. त्याच कढईत १ वाटी साखर घालून ती कढईत नीट पसरुन घ्यायची. पाणी न घालता अगदी कमी गॅसवर ही साखर विरघळू द्यायची. 

५. साखर विरघळून त्याचा पाक व्हायला लागला की ती चमच्याने हलवली तरी चालते. या साखरेचे विरघळून घट्टसर कॅरेमल तयार होते. 

६. सगळी साखर विरघळली की गॅस बंद करुन त्यात तीळ घालायचे. 

७. एकदम गरम असतानाच हे मिश्रण पोळपाट किंवा ताटावर लाटण्यासाठी घ्यायचे आणि झटपट लाटायचे. 

८. आवडीनुसार यावर बदाम, पिस्त्याचे काप घालू शकता. 

९. पण शक्य तितकी पातळ लाटली तर ती छान लागते आणि मस्त कडक होऊन खायला सोपी होते.  

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.मकर संक्रांती