पडवळ तसं फार कमी लोकांना आवडतं. या भाजीची चव चांगली असूनही घरी आणली जातेच असं नाही. पडवळ रक्ताची कमतरता भरून काढते, हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवते, पचनक्रिया निरोगी ठेवते, मधुमेह नियंत्रित करते, हाडं मजबूत बनवते. एवढे गुणधर्म असूनही तिला फारशी पसंती मिळत नाही. भारतीय आहारात पडवळाची भाजी चणा डाळ, मूग डाळ, कांदा, टोमॅटो घालून किंवा पीठ पेरून केली जाते. त्यात थोडासा बदल म्हणून ही पडवळ करी एकदा नक्की ट्राय करा.
साहित्य :
पाव किलो पडवळ, अर्धा वाटी ओलं खोबरं, आल्याचा एक तुकडा, लसुणाच्या तीन पाकळ्या, चमचाभर चणा डाळ, चमचाभर पंढरपुरी डाळ, १ मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर, २ मिरच्या, एक लवंग, छोटा दालचिनीचा तुकडा, तिखट, धने पावडर, १ मध्यम आकाराचा टोमॅटो, मीठ.
कृती :
>> सर्वप्रथम पडवळ, ओलं खोबरं, आलं, लसूण, चणा डाळ, पंढरपुरी डाळ, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, एक लवंग, दालचिनीचा तुकडा, तिखट, धने पावडर या सगळ्या गोष्टींचे थोडेसे पाणी घालून वाटण करून घ्या.
>> त्यानंतर कुकरमध्ये तेल घालून मोहरी, चणा डाळ घालून परतून घ्या, मिरची, कांदा, टोमॅटो घालून परतून घ्या.
>> त्यातच तयार केलेले वाटण आणि गरजेनुसार पाणी घाला.
>> पडवळाचे चौकोनी चिरलेले काप आणि मीठ घालून सगळे जिन्नस एकजीव करा.
>> कुकरचे झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घ्या.
>> चविष्ट पडवळ करी तयार. ही तुम्ही भाताबरोबर किंवा पोळ्यांबरोबर खाऊ शकता. दोन घास जास्तच जातील हे नक्की!