मेथीची भाजी तशी चवीला कडूच... मेथीच्या भाजीला येणाऱ्या कडवट चवीमुळे बहुतेकजण मेथीची भाजी म्हटलं की नकोच म्हणतात. आपल्यापैकी सगळ्यांच्याच घरात मेथीची भाजी (Lasooni Methi) केली जाते. परंतु नेहमीची तीच ती सुकी मेथीची भाजी तयार करण्यापेक्षा आपण या मेथीच्या भाजीला थोडा ट्विस्ट देत, मस्त लसूणी मेथी (Lahesuni Methi Recipe) तयार करु शकतो. कडवटपणा असलेल्या मेथीला लसूण, मसाले आणि खमंग फोडणी दिल्याने तिचा कडवटपणा नाहीसा होऊन ती अधिक चविष्ट लागते( Restaurant Style Lasuni Methi).
मेथीची अशी मस्त चमचमीत, खमंग चवीची भाजी केल्यावर नको म्हणणारे देखील अगदी ताव मारत ही भाजी खातील. गरमागरम भाकरी किंवा चपाती सोबत किंवा वाफाळत्या भातासोबत ही चमचमीत, झणझणीत लसूणी मेथी खायला अधिकच चविष्ट लागते. रोजच्या मेथीच्या त्याच त्या सुक्या भाजीचा कंटाळा आला असेल तर पण अशा प्रकारची चमचमीत ढाबा स्टाईल लसूणी मेथी घरच्याघरीच तयार करु शकतो. लसूणी मेथी करण्याची झटपट रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. चणा डाळ - ३ टेबलस्पून (भाजलेली चणा डाळ)
२. पांढरे तीळ - २ टेबलस्पून (भाजलेले तीळ)
३. शेंगदाणे - १/२ कप (भाजलेले शेंगदाणे)
४. पाणी - गरजेनुसार
५. मेथी - १ जुडी
६. तेल - ३ ते ४ टेबलस्पून
७. लसूण - २ टेबलस्पून (बारीक चिरलेला)
८. मीठ - चवीनुसार
९. जिरे - १/२ टेबलस्पून
१०. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)
११. काश्मिरी लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून
१२. हळद - १ टेबलस्पून
१३. टोमॅटो प्युरी - १ कप
कृती :-
१. सगळ्यात आधी मेथी स्वच्छ धुवून मग बारीक चिरुन घ्यावी.
२. एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात भाजलेली चणा डाळ, पांढरे तीळ, शेंगदाणे आणि गरजेनुसार पाणी घालून त्याची पातळ पेस्ट तयार करुन घ्यावी.
३. पॅनमध्ये तेल घेऊन त्यात जिरे आणि बारीक चिरलेला लसूण घालून खमंग फोडणी तयार करुन घ्यावी. मग यात बारीक चिरलेली मेथी व चवीनुसार मीठ घालावे. मेथी व्यवस्थित तेलात परतवून घ्यावी.
Traditional Food :मुसळधार पावसात गरमागरम वाफाळत्या चहासोबत बिस्किट नको खा पारंपरिक मुगाची मठरी!
पावसाळ्यात लोणावळ्याला जाणं शक्य नाही, मग लोणावळा स्पेशल चॉकलेट फज घरीच करा मोजून १० मिनिटांत...
४. आता एका दुसऱ्या भांड्यात तेल घेऊन त्यात जिरे, बारीक चिरलेला कांदा, काश्मिरी लाल मिरची पावडर, हळद घालावी. मग यात मिक्सरमध्ये वाटून तयार केलेली पेस्ट घालावी. ही पेस्ट चांगली शिजल्यानंतर यात टोमॅटोची प्युरी घालावी. या मिश्रणाला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत हलकेच चमच्याने हलवून मिश्रण ढवळत राहावे.
५. मग या तयार मिश्रण थोडे गरम पाणी घालून व्यवस्थित शिजवून घ्यावी. सगळ्यांत शेवटी यात परतवून घेतलेली मेथी घालावी. आता चमच्याने हलवून सगळे मिश्रण एकजीव करुन घ्यावे.
६. सगळ्यात शेवटी एका भांड्यात तेल, लसूण, मिरची पावडर घेऊन खमंग अशी फोडणी तयार करुन घ्यावी ही फोडणी तयार भाजीवर ओतावी.
मस्त झणझणीत, चमचमीत चवीची अशी लसून मेथी भाजी खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम चपाती किंवा वाफाळत्या भातासोबत आपण ही भाजी खाऊ शकता.