कोकण म्हटलं की आपल्याला विविध पदार्थांची चव चाखायला मिळते. उन्हाळा सुरु झाला की कोकणात एका खास भाजीची लगबग सुरु असते. ती म्हणजे कोवळ्या फणसाची भाजी. ज्याला कुयरीची भाजी असंही म्हटलं जातं. या भाजीत ओल्या नारळाचे वाटण, घरगुती मसाले घातले जातात. यामुळे याची चव अप्रतिम लागते. (kachya fansachi bhaji recipe)
या भाजीची चव अप्रतिम करण्यासाठी फणस सोलण्यापासून ते तो नीट शिजवण्यापर्यंतची प्रत्येक पायरी या भाजीची लज्जत वाढवते. तांदळाची मऊ लुसलुशीत भाकरी किंवा गरमागरम भातासोबत ही भाजी आवडीने खाल्ली जाते. (kovlya fansachi bhaji recipe)कोकणात फणसाच्या भाजीला विशेष महत्त्व आहे. ही भाजी केवळ चविष्ट नसते, तर ती आरोग्यदायी देखील मानली जाते. मालवणी पद्धतीची ही सुकी भाजी किंवा मसाला करण्याची खास सोपी आणि पारंपरिक पद्धत पाहूया.
ऊन तापलं, सांडगे केले की नाही? पाहा पारंपरिक कृती आणि ३ टिप्स, जाळं लागणार नाही - वर्षभर टिकतील
साहित्य
कच्चा फणस- १ मध्यम
मीठ चवीनुसार
तेल- २-३ चमचे
मोहरी- १/२ चमचा
जिरे- १/२ टीस्पून
ठेचलेला लसूण पाकळ्या- १०-१२
कढीपत्ता
बारीक चिरलेला कांदा- १ मोठा
हिंग- १/४ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
मिरची पावडर- १ टीस्पून
साठवणीचा मसाला- २ चमचे
मीठ घालून शिजवलेले ओले हरभरे- १ वाटी
कोथिंबीर
कृती
1. सगळ्यात आधी फणस कापताना हाताला आणि विळीला थोडे तेल लावा, ज्यामुळे फणसाचा चिकट चीक हाताला चिकटणार नाही. फणसाचे २ ते ३ इंच जाडीचे काप करा. प्रेशर कुकरमध्ये फणसाचे काप, पाणी आणि थोडे मीठ घालून २ शिट्ट्या करा.
2. कुकर थंड झाल्यानंतर फणासाचे काप बाहेर काढून थंड होऊ द्या. त्याची साल काढून टाका. त्यानंतर फणस हाताने मॅश करुन घ्या.
3. एका कढईत तेल गरम करुन त्यात मोहरी, जिरे घाला. त्यानंतर कढीपत्ता, हिंग आणि ठेचलेला लसूण घालून खमंग परतून घ्या.
4. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत परता. त्यात हळद, लाल तिखट, मसाले घाला. चवीनुसार मीठ घालून थोडं पाणी घाला. ज्यामुळे मसाला जळणार नाही. सर्व साहित्य नीट एकत्र करुन घ्या.
5. यात उकडलेला आणि मॅश केलेला फणस, शिजवलेले चणे घालून व्यवस्थित परतवून घ्या. भाजीवर थोडे पाणी शिंपडा, झाकण ठेवा आणि मंद आचेवर ३ ते ४ मिनिटे वाफ काढून घ्या. वाफ आल्यानंतर वरुन कोथिंबीर घाला. तयार होईल कच्च्या फणसाची भाजी.
