Join us  

कोजागरी पौर्णिमा स्पेशल : विकतचा महागडा मसाला आणण्यापेक्षा घरीच करा दूध मसाला, मिळेल परफेक्ट पारंपरिक चव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2023 1:40 PM

Kojagari Pornima Special Masala dudh recipe : दूध. पौर्णिमेच्या चंद्राला या दुधाचा नैवेद्य दाखवून त्यात चंद्राचे प्रतिबिंब पाहून हे दूध प्रसाद म्हणून प्यायले जाते.

कोजागरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा देशभरात अतिशय उत्साहाने साजरी केली जाते.  कोजागरी म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी आठवतो तो चंद्र आणि सोबत मसाला दूध. पौर्णिमेच्या चंद्राला या दुधाचा नैवेद्य दाखवून त्यात चंद्राचे प्रतिबिंब पाहून हे दूध प्रसाद म्हणून प्यायले जाते. चंद्राला मोठा भाऊ मानून ओवाळण्याची आणि त्याला मनोभावे नमस्कार करण्याची पद्धत आहे. रात्री झोपताना दूध पिण्याचे आरोग्याच्या दृष्टीने बरेच महत्त्व सांगितले आहे. कोजागरीच्या दिवशीही आवर्जून हे दूध घेतले जाते याचे महत्त्वाचे कारण ऋतूबदल होत असताना पित्त होण्याची शक्यता असते. या पित्ताचे शमन होण्यासाठी दूध पिणे अतिशय फायदेशीर ठरते.मसाला दूध करण्यासाठी बहुतांशवेळा मसाला विकत आणला जातो. पण यामध्ये नेमके काय घातलेले असते हे समजत नाही. तसेच हा मसाला खूप जास्त महाग असतो. त्यापेक्षा घरच्या घरी स्वच्छतेमध्ये आणि आपल्याला हवे ते जिन्नस वापरुन दुधाचा मसाला तयार केला तर तो जास्त पौष्टीक आणि चविष्ट होऊ शकतो. हा मसाला करणे अगदी सोपे असून त्यासाठी लागणारे जिन्नस आणि करण्याची पद्धत समजून घ्यायला हवी (Kojagari Pornima Special Masala dudh recipe). 

साहित्य -

१. काजू - ८ ते १०

२. पिस्ते - १२ ते १५ 

३. बदाम - १० ते १२

४.  जायफळ पूड - पाव चमचा 

५. वेलची पूड - १ चमचा 

६. साखर - ३ ते ४ चमचे 

७. बडिशेप - अर्धा चमचा 

८. केशरच्या काड्या - ८ ते १० 

कृती - 

१. सगळ्यात आधी काजू, पिस्ता आणि बदाम मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे भाजून घ्या. आणि त्यानंतर ते पुर्णपणे थंड होऊ द्या.

२. त्यानंतर जायफळ पूड, वेलची पूड, बडिशेप, साखर मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक पूड पावडर करून घ्या. 

३. आता भाजलेला सुकामेवा गार झाला असल्यास तो मिक्सरमध्ये घालून त्याचीही ओबडधोबड पावडर करून घ्या.

४. सुकामेव्याची पावडर आणि आधी तयार केलेली पावडर एका भांड्यात एकत्र करा. त्याता केशर, घालून हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करा म्हणजे दूध मसाला तयार होईल. 

५. साधारण ३ कप दूध गरम करायला ठेवा. त्यात चवीनुसार साखर घाला. दूध घट्टसर हवे असेल तर थोडी मिल्क पावडर घातली तरी चालेल. 

६. हे सगळे ४ ते ५ मिनिटे उकळलं की त्यात दूध मसाला टाका. एक कपसाठी एक टेबलस्पून मसाला असं प्रमाण घ्यायला हवं. मसाला घातल्यानंतर हे सगळे पुन्हा ४ ते ५ मिनिटे उकळू द्या, चविष्ट मसाला दूध तयार होईल. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.कोजागिरी