दिवाळीचा फराळ म्हटलं की, ताटात गोडासोबतच खारे, तिखट चमचमीत, चटपटीत पदार्थ हवेच...फराळात आपण लाडू, करंज्या, चिवडा, चकल्या असे पदार्थ खातोच, यासोबतच गोडाच्या शंकरपाळ्या सगळ्यांच्याच आवडीच्या...परंतु दिवाळी सणानिमित्त शक्यतो गोडाधोडाचे पदार्थ खाणे होतेच, अशावेळी बरेचदा गोड खाऊन कंटाळाही येतो. यासाठीच, फराळाच्या ताटात काहीतरी खमंग, चटपटीत आणि खुसखुशीत हवे असेल तर खाऱ्या शंकरपाळ्या हा एक बेस्ट पदार्थ आहे. फराळ म्हणून किंवा चहासोबत खाण्यासाठी, मधल्या वेळेत लागलेल्या भुकेसाठी खारी शंकरपाळी एकदम परफेक्ट पदार्थ आहे. दिवाळीच्या फराळात नेहमीच्या त्याच त्या गोडाच्या शंकरपाळ्या खाऊन कंटाळा आला असेल तर या खाऱ्या शंकरपाळ्या यंदा नक्की करुन पाहा(How To Make Khari shankarpaali At Home).
या शंकरपाळ्या तयार करायला अगदी सोप्या असून त्यासाठी लागणारे जिन्नसही घरातच सहज उपलब्ध असतात. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊसर अशी शंकरपाळी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटते. तोंडात टाकताच विरघळणारी (Khari shankarpaali Recipe) आणि भरपूर लेअर्स असणारी खारी शंकरपाळी कशी करायची याची रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. मैदा - १/२ किलो
२. तेल - ७५ ग्रॅम (हलके गरम करुन घेतलेले)
३. ओवा - १ टेबलस्पून
४. जिरे - १ टेबलस्पून
५. कसुरी मेथी - १ टेबलस्पून
६. मीठ - चवीनुसार
७. कलोंजी - १ टेबलस्पून
८. पाणी - गरजेनुसार
सोडा न वापरता करा, विकतसारखी आलू भुजिया शेव! चवीला अप्रतिम, कुरकुरीत - यंदाचा फराळ करा खास...
कृती :-
१. एका मोठ्या बाऊल किंवा परातीमध्ये मैदा घेऊन त्यात ओवा, जिरे, कलोंजी, कसुरी मेथी, चवीनुसार मीठ व थोडे गरम तेलाचे मोहन घालावे.
२. आता हे सगळे जिन्नस मैद्याच्या पिठामध्ये कालवून एकजीव करून घ्यावे.
३. त्यानंतर गरजेनुसार पाणी घेऊन पीठ व्यवस्थित मळून घ्यावे, मळून घेतलेल्या पिठावर झाकण ठेवून १५ ते २० मिनिटे झाकून ठेवावे.
ना भाजणीची झंझट, ना चकली मऊ पडण्याचे टेंन्शन! करा कुरकुरीत बटर चकली - होईल लगेच फस्त...
४. त्यानंतर तयार पिठाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करुन चपाती प्रमाणे लाटून घ्यावे.
५. सुरीच्या मदतीने काप किंवा शंकरपाळीचा आकार देऊन या शंकरपाळ्या तयार करून घ्याव्यात.
६. गरम तेलात शंकरपाळ्या सोडून हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्याव्यात.
मस्त अशा चटपटीत, खुसखुशीत खाऱ्या शंकरपाळ्या खाण्यासाठी तयार आहेत.