Join us  

झटपट करा चमचमीत शेव भाजी; चवीला बेस्ट- करायला सोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2022 6:13 PM

पाहूया झाबा स्टाईल शेवभाजी करायची सोपी आणि मस्त रेसिपी...

ठळक मुद्देऐनवेळी भाजीला झटपट पर्याय असलेली शेवभाजी कशी करायची पाहूयालहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणाऱ्या चविष्ट शेवभाजीची खास रेसिपी

रोज उठून कोणती भाजी करायची असा प्रश्न आपल्यासमोर असतोच. घरातल्या सगळ्यांना सगळ्या भाज्या आवडतात असे नाही. मग प्रत्येकाच्या आवडीनुसार भाज्या कराव्या लागतात. त्यातही उन्हाळ्यात भाज्या खूप महाग असल्याने आणि भाज्या लवकर शिळ्या होत असल्याने सतत काय करायचे हा प्रश्न असतोच. अशावेळी चमचमीत अशी शेव भाजी हा उत्तम पर्याय असतो. पोळी, भाकरी कशासोबतही छान लागणारी ही शेवभाजी सगळ्यांना आवडेल अशी असते आणि ती होतेही झटपट.

(Image : Google)

घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून होणारी ही भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण आवडीने खातात. एखादवेळी संध्याकाळी किंवा पाहुणे येणार असतील तेव्हा पटकन काय करायचे असा प्रश्न असेल तर हा अतिशय उत्तम पर्याय आहे. गरम शेवभाजी सोबत कांदा, लिंबू आणि इतर सलाड असेल तर जेवायला आणखी काही नसेल तरी चालते. गरम भातासोबतही ही भाजी छान लागते. खान्देशी पदार्थ असलेली ही भाजी ढाब्यासारख्या ठिकाणी अतिशय छान मिळते. हीच शेवभाजी घरी कशी करायची याविषयी जाणून घेऊया.

साहित्य -

१. कांदे - २ मोठे 

२. टोमॅटो - ३ मध्यम

३. आलं-मिरची-लसूण पेस्ट - १ चमचा 

४. गूळ - १ चमचा 

५. मीठ - चवीनुसार 

६. गोडा मसाला - अर्धा चमचा 

७. लाल तिखट - अर्धा चमचा 

८. धने-जीरे पावडर - अर्धा चमचा 

९. मीरे, लवंग, दालचिनी - ४ 

१०. जाड लाल शेव - २ ते ३ वाट्या 

११. कोथिंबीर - अर्धी वाटी

१२. तेल - १ चमचा 

(Image : Google)

कृती -

१. कढईत तेल गरम करुन त्यात काळी मिरी, लवंग, तमालपत्र गरम करुन परतून घ्यावे. 

२. यामध्ये आलं-मिरची-लसूण पेस्ट, चिरलेला कांदा आणि टोमॅटो चांगला परतून घ्यावा. 

३. हे सगळे गार झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.

४. पुन्हा कढईमध्ये तेल गरम करुन त्यामध्ये हिंग, हळद आणि मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट घालावी. ती चांगली परतल्यावर त्यामध्ये धने-जीरे पावडर, गोडा मसाला, तिखट घालून सगळे चांगले एकजीव करावे.

५. यामध्ये मीठ आणि गूळ घालून गरजेनुसार थोडे पाणी घालून चांगली उकळी आणावी.

६. गरमागरम ग्रेव्ही वाटीत घेतल्यावर त्यामध्ये शेव घालून वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. 

७. ही गरमागरम शेवभाजी पोळी, भाकरी अशा कशासोबतही अतिशय चविष्ट लागते.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.