Join us  

How To Make Tasty Curd At Home : गोड कवडी दही लावण्याची खास पद्धत; विकतचे- मटक्यासारखे खुटखुटीत दही आता लावा घरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 11:30 AM

How To Make Tasty Curd At Home : घरच्या घरी गोड दही लागण्यासाठी नेमके काय करायचे समजून घेऊया.

ठळक मुद्देविकतसारखे खवल्याचे दही घरी लावण्यासाठी फॉलो करा खास टिप्स प्रोटीन आणि कॅल्शियमचा स्रोत असलेले दही आहारात आवर्जून असायला हवे

उन्हामुळे शरीराची लाहलाही झालेली असताना आपण सगळेच जेवणात काही ना काही गार घ्यायचा प्रयत्न करत असतो. यामध्ये प्रामुख्याने दही, ताक यांचा समावेश असतो. कधी सकाळी नाश्त्याला एखाद्या पदार्थाबरोबर तर कधी एखाद्या कोशिंबीरीत दही आवर्जून घातले जाते. घरात विकतसारखे गोड आणि कवडीचे दही लागत नसल्याने आपण विकतचे दही आणतो. पण विकतच्या दह्यात अनेकदा जिलेटीनचा वापर केलेला असण्याची शक्यता असते. त्यापेक्षा घरीच छान विकतसारखे मडक्यातल्या दह्यासारखे घट्ट आणि गोडसर दही लावता आले तर? (How To Make Tasty Curd At Home)

(Image : Google)

दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, व्हीटॅमिन बी ६, बी १२ जास्त प्रमाणात असल्याने दही आणि ताक या दोन्हीचा आहारात समावेश असायलाच हवा असे आहारतज्ज्ञांकडून नेहमी सांगितले जाते. मात्र दही खाताना त्यामध्ये साखर, मध किंवा तूप घालून खावे म्हणजे ते पचायला सोपे होते असे आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात. प्रोटीन आणि कॅल्शियम ही दोन्ही पोषकतत्त्वे हाडांच्या मजबूतीसाठी अतिशय आवश्यक असतात. पचनाच्या तक्रारींसाठीही दही अतिशय उपयुक्त असते. दह्याचे ताक केल्याने त्यावर प्रक्रिया होते आणि ते पचायला सोपे होते. आता घरच्या घरी गोड दही लागण्यासाठी नेमके काय करायचे समजून घेऊया.

दही लावण्याच्या पायऱ्या 

१. एका लहानशा पातेल्यात दूध घेऊन ते आपले बोट जाईल इतकेच गरम करायचे.

२. हे दूध निरसं असू नये तर आधी तापवलेले असावे. 

३. या दूधात थोडी साय असेल तरी चालते, ज्यामुळे दही आणखी छान लागण्यास मदत होते. 

४. एका चमच्यात फार आंबट नसलेले अर्धा चमचा विरजण घेऊन ते एका बोटाने फेटून एकसारखे करावे.

(Image : Google)

५. दही फेटलेला हा चमचा कोमट दुधात घालावा आणि ४ ते पाच वेळा गोल फिरवावा.

६. या पातेल्यावर एक झाकण ठेवून ते कुकरमध्ये झाकण लावून एका बाजूला ठेवावे, कुकर पूर्ण बंद असल्याने उष्णतेमुळे ५ ते ६ तासात गोड आणि खवल्याचे दही अगदी छान लागते. 

७. विरजण घालत असताना दूध नीट कोमट आहे ना हे तपासून घ्यावे, दूध जास्त गरम किंवा कमी गरम असेल तर दही नीट लागत नाही. 

८. एकदा विरजम लावले की ते भांडे शक्यतो हलवू नये, म्हणजे विकतसारखे खवल्याचे दही लागायला मदत होते.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.