सध्याच्या धावपळीच्या जीवनात हेल्दी आणि झटपट तयार होणारे पदार्थ प्रत्येकालाच हवे असतात. सकाळचा नाश्ता असो, डब्यासाठी काही हलकं हवं असो किंवा संध्याकाळच्या चहासोबत खायला काहीतरी पौष्टिक शोधत असाल, तर ढोकळा हा कायमचा फेव्हरेट पर्याय ठरतो.(besan dhokla at home) पण अनेकदा घरी ढोकळा केला की तो कडक होतो, जाळीदार होत नाही किंवा नीट फुगत नाही. अशावेळी आपण विकतचा ढोकळा आणून खातो.
रवा, बेसनाचा ढोकळा खाऊन देखील आपल्याला अनेकदा वैताग येतो. कधी व्यवस्थित शिजत नाही तर कधी तो नीट फुगत नाही. अनेकदा तर तो आतून कच्चाच राहतो.(healthy dhokla recipe) पण योग्य प्रमाणात साहित्य आणि काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर झटपट ढोकळा तयार होईल. अशावेळी आपण दलिया आणि बेसनाच्या पीठापासून झटपट होणारा ढोकळा बनवू शकतो. पाहूया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
डाएटवाल्यांसाठी सुपर ट्रिक! कॉफीमध्ये मिसळा 'इतकं'तूप, बेली फॅट कमी- त्वचेवर येतो नैसर्गिक ग्लो
साहित्य
दलिया - १ कप
दही - १/४ कप
बेसन - १/२ कप
हिरव्या मिरच्या -४
आले - १ तुकडा
पाणी - अर्धा कप
हळद - १/४ चमचा
बारीक चिरलेली कोथिंबीर - अर्धा चमचा
कढीपत्त्याची पाने - ४ ते ५
मीठ - चवीनुसार
तेल - ३ चमचे
इनो - १ चमचा
मोहरी - अर्धा चमचा
तीळ - अर्धा चमचा
कृती
1. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये दलिया घेऊन दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यानंतर त्यात दही घालून मिश्रण एकजीव करा आणि १५ मिनिटे सेट होण्यास ठेवा.
2. मिक्सरच्या भांड्यात दलियाचे बॅटर, बेसन, हिरवी मिरची, आले आणि थोडेसे पाणी घालून बॅटर तयार करा.
3. आता या बॅटरमध्ये चिरलेला कोथिंबीर, कढीपत्ता, मीठ, तेल घालून सर्व साहित्य मिक्स करा. हळद घालून पुन्हा बॅटर फेटून घ्या.
4. थोडेसे बॅटर काढून घ्या आणि उरलेल्या बॅटरमध्ये इनो घालून फेटून घ्या. स्टीम प्लेटला ऑइलने ग्रीस करून त्यात तयार बॅटर घाला. वरुन लाल मिरची पावडर घाला.
5. १० ते १२ मिनिटे वाफ काढून घ्या. शिजल्यानंतर बाहेर काढून ठेवा. आता फोडणी पात्रात तेल घेऊन त्यात मोहरी, तीळ, कढीपत्ता घाला. तयार फोडणी ढोकळ्यावर वरुन पसरवा. झटपट स्पाँजी ढोकळा खा.
