महाराष्ट्रीयन जेवणाची खरी शान कशात असेल, तर ती ताटाच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या चटणी, लोणचं आणि चमचमीत ठेच्यामध्ये आहे... रोजच्या जेवणाच्या ताटात कितीही वेगवेगळ्या चवींचे पदार्थ असले तरीही ताटातील तोंडी लावण्याच्या पदार्थांची चव अप्रतिमच लागते. भाजीला काय करायचं? हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला दिवसातून किमान दोनदा तरी सतावतोच. फ्रिजमधील भाजी संपली असेल किंवा काहीतरी वेगळं आणि झटपट खाण्याची इच्छा असेल, तर 'कांदा-शेंगदाणाचा ठेचा' हा सगळ्यात उत्तम आणि चविष्ट पदार्थ...(How To Make Shengadana Kanda Thecha At Home).
साध्या जेवणाला मेजवानीचं रूप देणारा एकच पदार्थ आहे, तो म्हणजे 'कांदा - शेंगदाण्याचा चमचमीत ठेचा'... खमंग भाजलेल्या शेंगदाण्यांचा तो खरपूस वास, कढईत परतलेल्या ओल्या कांद्याचा गोडवा आणि सोबतीला मिरच्यांचा तो तिखट ठसका... हा मेळ जेव्हा जिभेवर एकत्र येतो, तेव्हा दोन घास जास्तीचेच जातात. गरमागरम बाजरीची भाकरी, त्यावर तेलाची धार आणि सोबत कांदा - शेंगदाण्याचा झणझणीत ठेचा... हा नुसता पदार्थ नाही, तर सुख आहे...कमी साहित्य आणि फारशी मेहनत न घेता (Shengadana Kanda Thecha Recipe) तयार होणाऱ्या या कांदा - शेंगदाण्याच्या ठेच्याची अस्सल गावरान रेसिपी पाहूयात...
साहित्य :-
१. कांदा - १ कप
२. तेल - १ ते २ टेबलस्पून
३. जिरे - १ टेबलस्पून
४. शेंगदाणे - १ कप
५. हिरव्या मिरच्या - २ ते ३ मिरच्या
६. मीठ - चवीनुसार
७. कोथिंबीर - १ कप
पोह्याचं थालीपीठ करा फक्त १० मिनिटांत, आई भूक लागली काहीतरी मस्त कर म्हणणारी मुलंही होतील खुश...
कृती :-
१. सगळ्यात आधी कांदा उभा चिरुन घ्यावा.
२. कढईत तेल घेऊन त्यात जिरे, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, कांदा, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालावी. मग हे सगळे मिश्रण २ ते ५ मिनिटे हलकासा खरपूस रंग येईपर्यंत तेलात चांगले परतवून घ्यावे.
३. मग हे तेलात परतवून घेतलेलं मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात काढून थोडं गार होऊ द्यावं.
४. त्यानंतर हे मिश्रण मिक्सरमध्ये जाडसर भरड होईपर्यंत वाटून घ्यावं.
कांदा - शेंगदाण्याचा चटपटीत, चमचमीत ठेचा खाण्यासाठी तयार आहे. हा ठेचा आपण गरमागरम भाकरी, चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता. आपल्या आवडीनुसार आपण या गरमागरम ठेच्यावर चमचाभर तेल घालून देखील खाऊ शकता, यामुळे चव अधिक जबरदस्त लागते.
