Join us

लाडू-बर्फी-वड्यांचा पाक नेहमी बिघडतो? ३ टिप्स, चुकूनही लाडू-वडी बिघडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2022 16:32 IST

एकतारी ते तीनतारी पाक कशासाठी आणि केव्हा करायचा हे गणित कळलं की जमलाच उत्तम लाडू आणि वडी

ठळक मुद्देआता तुम्ही ठरवा पदार्थ कोणता आणि पाक कसा हवा ते..

नवरात्र आता. मग पुढे दिवाळी. नैवेद्याचे पदार्थ घरी करतोच आपण. त्यात सगळ्यात जास्त टेंशन येतं ते पाकाचं. लाडू वड्या करण्याचं. मी मी म्हणणाऱ्यांचा पाक कधी बिनसेल आणि लाडू कधी बिघडेल सांगता येत नाही. त्यामुळे पाकाचे पदार्थ हे जरा डोकं शांत ठेवून फुरसतीत करावे लागतात. पण ते करताना नेमका कोणत्या पदार्थासाठी कोणता पाक करायचा हे जर आपल्याला माहिती असेल तर गोेष्टी सोप्या होतात.त्यासाठी लाडू आणि वड्यांसाठी कसा पाक करायचा याचं एक सोपं सूत्र समजून घेऊ. लाडू बिघडणार नाही की वड्यांचा लगदा होणार नाही, खात्री बाळगा.

(Image : google)

पाक करताना लक्षात ठेवा

१. साखर भिजेल इतकंच पाणी घाला. हे मिश्रण गॅसवर ठेवलं की तिथून हलू नका. कारण पाक फार भराभर उकळतो आणि लवकर घट्ट व्हायला लागतो. सतत ढवळत राहा. 

आता कशासाठी कोणता पाक करायचा?

१. रवा बेसन लाडवासाठी एकतारी पाक करायचा. म्हणजे पाक उकळू लागला की एकच तार तुटली की लगेच गॅस बंद करुन टाकायचा त्यात मिश्रण घालायचे.हा पाक पातळ असतो. झारा पाकात बुडवून वर केला की त्याची एकच धार पडते. याला एकतारी पाक म्हणतात. रवा जास्त वेळ मुरावा आणि लाडू छान मऊ व्हावा म्हणून हा पाक उत्तम. या पाकात रवा घातला की तो मुरुन लाडू व्हायला वेळ लागतो. त्यामुळे घाबरू नये.

२. रवा नारळ बेसन किंवा खवा असे मिश्रण असेल तर पाक दोन तारी करावा. हा एकतारीपेक्षा घट्ट. मुळात मिश्रणात ओलावा असतो त्यामुळे पाक दोन तारी केला तरी चालतो. पाक दोन तारी झाला की साखळी बनल्याने दुसरी तारही सुटू लागते. यालाच दोन तारी पाक असं म्हणतात. 

(Image : Google)

३. तीन तारी आणि गोळीबंद पाक पाकाचा झारा वर केला की तीनदा तार तुटते. तो तीन तारी पाक.  बशीत पाणी घेऊन पाक टाकला की लगेच गोळी होती. असा गोळींबंद पाक केला तर लाडू लगेच वळायला येतो. पण त्यामुळे रवा छान मुरत नाही. भगराळा लाडू होतो. पण तुम्ही बर्फी करत असाल तर हा तीन तारी पाक उत्तम. वड्या खुटखुटीत होतात.आता तुम्ही ठरवा पदार्थ कोणता आणि पाक कसा हवा ते.. 

टॅग्स :अन्नपाककृती