Join us

लक्षात ठेवा फक्त ३ टिप्स आणि करा मऊसूत पोळ्या, वातड होण्याचा तर प्रश्नच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2023 16:01 IST

How To Make Perfect Soft Roti Simple Tips : पोळ्या मऊ लुसलुशीत व्हाव्यात आणि दिर्घकाळ तशाच राहाव्यात यासाठी काय करायला हवं

उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला शरीराची लाहीलाही होत असल्याने आपल्याला म्हणावे तसे जेवण जात नाही. एकतर सतत पाणी नाहीतर गार काहीतरी प्यावेसे वाटते. त्यामुळे पोट डब्ब होते आणि पुरेशी भूक लागत नाही. त्यातही पोळी भाजी तर उन्हाळ्याच्या दिवसांत अजिबात नको वाटते. बरेचदा उन्हाने पोळ्या वातड होतात आणि कोरडी भाजी असेल तर खाव्याशा वाटत नाहीत. अनेकांसाठी पोळ्या करणे हे कणीक मळणे, पोळ्या लाटणे आणि भाजणे अशा बऱ्याच प्रक्रिया असल्याने थोडे वेळखाऊ आणि जिकरीचे काम असते. पोळ्या मऊसूत व्हाव्यात यासाठी कणीक मळताना आणि पोळ्या करताना काही किमान गोष्टींची काळजी घ्यायला हवी. पोळ्या मऊ लुसलुशीत व्हाव्यात आणि दिर्घकाळ तशाच राहाव्यात यासाठी काय करायला हवं यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया (How To Make Perfect Soft Roti Simple Tips)...

१. कणीक मळताना 

आपण साधारणपणे कणीक मळताना घाईघाईत साधे पाणी वापरतो. तसे न करता पाणी थोडं कोमट करायचं आणि मग वापरायचं. त्यामुळे कणीक जास्त मऊ मळली जाते. त्यानंतर हे पीठ किमान २० मिनीटे झाकून ठेवायचे म्हणजे पीठ चांगले मुरण्यास मदत होते. त्यानंतर पुन्हा एकदा हाताने चांगले मळून घ्यायचे म्हणजे कणीक छान मऊ होते.

२. पोळ्या लाटताना

पोळ्या लाटताना एक गोळा घेऊन पुरीइतकी पोळी लाटून घ्यायची. त्याच्या मधे सगळीकडे तेल आणि पीठ लावून ती दोन वेळा दुमडायची. मग कडेकडेने पोळी लाटायची. पीठाचा कमीत कमी वापर करायचा. 

३. भाजताना लक्षात ठेवा

पोळ्या भाजताना तवा चांगला गरम करुन घ्यायचा. मध्यम ते मोठ्या आचेवर पोळी भाजायची. बरेच जण पोळ्या भाजताना त्या सतत उलट-सुलट करत राहतात. मात्र त्यामुळेही पोळी वातड होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोळी भाजताना ती केवळ २ ते ३ वेळाच उलट-सुलट करायची. 

भाजल्यानंतर पोळीतील वाफ काढून टाकून तेल किंवा तूप लावून पोळी आधी स्टँडवर आणि मग डब्यात ठेवायची. अशी पोळी खायला तर छान लागतेच पण ती अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत मऊसूत राहते.  

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.