Join us

महाशिवरात्रीसाठी मथुरेच्या पेढ्यांचा नैवेद्य; घरच्याघरी 20 मिनिटात होतात मथुराचे खमंग पेढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2022 15:15 IST

महाशिवरात्रीला नैवेद्यासाठी करा मथुरेचे खमंग पेढे. 20 मिनिटात उत्तम चवीचे पेढे तयार होतात. 

ठळक मुद्देमथुरेच्या पेढ्यांसारखे खमंग चवीचे पेढे करण्यासाठी खवा मंद आचेवर भरपूर भाजावा लागतो. पेढ्यांसाठी पिठीसाखर जाडसर लागते. 

महाशिवरात्रीसारख्या खास उपवासाला काहीतरी खास, आपल्या हातानं तयार केलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा असेल तर मथुराच्या पेढ्यांचा पर्याय आहे. घरच्याघरी खास मथुरेच्या चवीचे पेढे तयार करता येतात. यासाठी घरी तयार केलेला खवा वापरल्यास पेढे जास्त खमंग होतात. विकतचा खवा आणला तरी तो चांगला भाजून मग त्याचे पेढे केले की चाॅकलेटी रंगाचे मस्त खमंग चवीचे मथुरा पेढे तयार होतात.

Image: Google

मथुरेचा पेढा घरी कसा करावा?

मथुरेचा पेढा घरी करण्यासाठी 200 ग्रॅम खवा, 200 ग्रॅम जाडसर पिठसाखर 5- 6 वेलचींची पूड आणि थोडं साजूक तूप लागतं.  मथुरेचा पेढा तयार करताना खवा घरी करायचा असल्यास तो आधी करुन घ्यावा. नाहीतर विकतचा खवा आणून तो भाजावा. घरी तयार केलेला असू देत किंवा बाहेरुन विकत आणलेला मथुरेच्या पेढ्यासाठी मंद आचेवर खवा चाॅकलेटी रंगावर खमंग भाजावा लागतो. पिठी साखर जाडसर हवी. ती ताजीच करावी. पिठी साखरेतच वेलची पावडर मिसळून घ्यावी. वेलची मिसळलेली पिठी साखर थोडी बाजूला काढून ठेवावी. 

Image: Google

खवा भाजताना गॅस मंद असावा. खवा भाजताना तो अजिबात कढईला चिकटायला नको. खवा भाजताना त्यात तूप घालण्याची गरज नसते.  खवा खमंग भाजला गेला की गॅस बंद करावा. खवा 10 मिनिटं तसाच ठेवावा. खव्यातली उष्णता निवळली की त्यात ताजी तयार केलेली पिठीसाखर आणि वेलची पूडचं मिश्रण घालावं. खव्यात ते चांगलं एकजीव करावं. हे मिश्रण हातावर चांगलं घासावं. मग त्याचे गोलाकार पेढे वळावेत.

पेढे जाडसर वळावेत. ते वळले की दोन्ही हातानं थोडे दाबून चपटे करावेत. पेढे वळून झाले की एका पसरट ताटलीत वेलची पूड घातलेली पिठीसाखर घालावी. या साखरेत पेढे गोलाकार फिरवून घ्यावेत. अशा पध्दतीने मथुराचे पेढे केले तर ते तयार करायल जास्तीत जास्त 20 मिनिटं लागतात.  पेढे वळताना मिश्रण जास्त गार झाल्यावर कडक होतं. म्हणून पेढे वळताना थोडं साजूक तूप गरजेप्रमाणे घातल्यास पेढे मऊ वळले जातात. ते कडक होत नाही. 

टॅग्स :अन्नकिचन टिप्स