सकाळच्या नाश्त्याला किंवा पूजेला प्रसाद म्हणून शिरा (Mango Sheera Recipe) हमखास केला जातो. मस्त गोडधोड, साजूक तुपातला, रवाळ, दाणेदार गरमागरम शिरा खाण्याची मज्जा काही औरच असते. एरवी आपण नेहमीचाच रव्याचा पांढराशुभ्र शिरा (How To Make Mango Sheera At Home) करतो, परंतु उन्हाळ्यात आंब्याच्या सिझनला मँगो शिऱ्याचा (Mango Suji Halwa) बेत झालाच नाही असे होणारच नाही. उन्हाळ्यात मिळणाऱ्या आंब्याचे अनेक पदार्थ करून ते अगदी चटकन फस्त केले जातात, त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे मँगो शिरा. पिवळाधम्मक, गोड, रवाळ, साजूक तुपातील शिरा घरातील सगळ्यांच्याच आवडीचा खास पदार्थ.
लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा हा मँगो शिरा करायला अतिशय सोपा आहे. उपलब्ध साहित्यात तो अगदी पटकन करता येतो. आत्तापर्यंत सगळ्यांच्याच घरात एव्हाना आंब्याच्या पेट्या आल्या असतीलच, तेव्हा यंदाच्या उन्हाळ्यात मँगो शिऱ्याचा झक्कास बेत व्हायलाच हवा. आंब्याचा पल्प वापरून शिरा करण्याची साधीसोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. आंब्याचा पल्प - १ कप
२. साजूक तूप - २ ते ३ टेबलस्पून
३. बारीक रवा - १ कप
४. केशर - ५ ते ६ काड्या
५. दूध - २ ते ३ कप
६. साखर - चवीनुसार
७. ड्रायफ्रुट्सचे काप - १/२ कप
८. वेलची पूड - चिमूटभर
कोकणातील पारंपरिक लुसलुशीत सुरनोळी करा नाश्त्याला, खास कोकणी बेत - रविवार होईल झक्कास!
हापूस आंब्याचा राजा असला तरी भारतातले हे ८ आंबे आहेत अतिशय गोड, पाहा कोणता खायचा...
कृती :-
१. सगळ्यात आधी आंबा स्वच्छ धुवून तो चिरून त्यातील संपूर्ण गर काढून घ्यावा. आता हा गर मिक्सरमध्ये फिरवून त्याची पेस्ट करून घ्यावी.
२. आता एका मोठ्या भांड्यात साजूक तूप घालून त्यात बारीक रवा हलकासा लाल रंग येईपर्यंत परतून घ्यावा.
३. रवा तुपात भाजून झाल्यावर त्यात केशर घातलेल गरम दूध घालावे.
उन्हाळ्यात करा केळीचे वेफर्स, कुरकुरीत-स्वादिष्ट आणि ताजेताजे! मुलांनी खाल्ले तरी नो टेंशन...
४. त्यानंतर चवीनुसार साखर घालावी. (आंब्याच्या गोडव्याचा अंदाज घेऊन मगच साखर घालावी.)
५. आता सगळे मिश्रण चमच्याने एकत्रित कालवून घ्यावे. मग झाकण ठेवून २ ते ३ मिनिटे वाफेवर शिरा शिजवून घ्यावा.
६. तयार मिश्रणात आंब्याची तयार केलेली पेस्ट घालावी. चमच्याने सगळे जिन्नस एकजीव करून घ्यावेत, तसेच झाकण ठेवून एक हलकी वाफ काढावी.
७. सगळ्यांत शेवटी यात ड्रायफ्रुट्सचे काप आणि वेलीची पूड घालावी. सगळे मिश्रण एकत्रित कालवून घ्यावे.
मँगो शिरा खाण्यासाठी तयार आहे. आपण हा गरमागरम शिरा वरुन ड्रायफ्रुट्सचे काप घालून खाण्यासाठी सर्व्ह करावा.