ढाब्यावर मिळणारा मऊ, लुसलुशीत आणि गरमागरम कुलचा हा अनेकांचा आवडता पदार्थ...बाहेरून कुरकुरीत आणि आतून लोण्यासारखा मऊ, लुसलुशीत, गरमागरम कुलचा... तो खाताना स्वर्गसुख मिळते.आपण हॉटेल किंवा ढाब्यावर गेल्यावर हमखास कुलचा खातोच परंतु, तंदूर नसल्यामुळे घरी तसा कुलचा तयार करणे मोठे अवघड काम वाटते. घरी तंदूर नसल्यामुळे किंवा कुलचा बनवण्याची रेसिपी किचकट वाटत असल्यामुळे अनेकजणी कुलचा घरी बनवण्याचे धाडस करत नाहीत. खरंतर, योग्य प्रमाणात साहित्य आणि तव्यावर शिजवण्याची खास पद्धत वापरली तर घरच्या घरी ढाबा-स्टाईल तवा कुलचा अगदी तसाच तयार होऊ शकतो. बाहेरून खमंग आणि आतून मऊ असा हा कुलचा चव, सुगंध आणि टेक्श्चर देखील अगदी परफेक्ट होते(How to make kulcha without tandur at home).
ढाब्यासारखाच अगदी हुबेहूब चवीचा, मऊ आणि लुसलुशीत कुलचा तयार करण्याची एक अतिशय सोपी रेसिपी पाहूयात. विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला तंदूरची अजिबात गरजच लागणार नाही! घरातील साध्या तव्यावर तुम्ही हा गरमागरम कुलचा अगदी सहज बनवू शकता. तंदूरशिवाय तव्यावरच तयार होणाऱ्या स्वादिष्ट, फुललेल्या ढाबा-स्टाईल कुलच्याची सोपी (How to make kulcha without tandoor) आणि परफेक्ट रेसिपी…
साहित्य :-
१. कोमट दूध - १/ २ कप
२. साखर - १ टेबलस्पून
३. मैदा - २ + १/२ कप
४. बेकिंग सोडा - १/२ टेबलस्पून
५. बेकिंग पावडर - ३/४ टेबलस्पून
६. मीठ - चवीनुसार
७. दही - १/४ कप
८. तेल - २ टेबलस्पून
९. पाणी - १/२ कप
१०. कलोंजी - १ टेबलस्पून
११. साजूक तूप - ३ ते ४ टेबलस्पून
१२. कोथिंबीर - ३ ते ४ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
कृती :-
१. एका छोट्या बाऊलमध्ये थोडे कोमट दूध घेऊन त्यात साखर मिसळून ती पूर्णपणे विरघळवून घ्यावी.
२. एक मोठ्या बाऊलमध्ये, मैदा घेऊन त्यात बेकिंग सोडा, बेकिंग पावडर व चवीनुसार मीठ घालावे. सगळे पीठ कालवून एकजीव करून घ्यावे.
३. मैद्यात साखर घातलेल कोमट दूध, दही, तेल आणि थोडे पाणी देखील घालावे. मग हे सगळे जिन्नस एकत्रित करून पीठ मळून घ्यावे.
४. मळून घेतलेलं पीठ १५ ते २० मिनिटे व्यवस्थित झाकून ठेवावे.
५. २० मिनिटांनंतर थोडे कोरडे पीठ मळून ठेवलेल्या पिठावर भुरभुरवून पुन्हा एकदा कणीक व्यवस्थित मळून घ्यावी. मग या तयार कणकेचे मध्यम आकाराचे गोळे तयार करुन घ्यावेत.
हिवाळ्यातील ताज्या-रसरशीत आवळ्याचा करा मुखवास! एकदा करा वर्षभर खा - पाचक, चटपटीत मुखवास रेसिपी...
६. मग प्रत्येक एक गोळा घेऊन तो हाताने दाब देत त्याला गोलाकार चपातीप्रमाणे आकार द्यावा. प्रत्येक कुलच्यावर कलोंजी व बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घालावी.
७. तवा गरम करून त्यावर कुलचा टाका आणि कडेने थोडे साजूक तूप आणि किंचित पाणी सोडून पॅन झाकून घ्या. वाफेवर कुलचा व्यवस्थित शेकून घ्यावा.
८. मग थोडे तेल किंवा तूप सोडून दुसऱ्या बाजूने देखील कुलचा नीट शेकून घ्या.
ढाब्यावर मिळतो अगदी तसाच मऊ, लुसलुशीत गरमागरम तवा कुलचा खाण्यासाठी सर्व्ह करावा. पनीर किंवा इतर ग्रेव्हीच्या भाज्यांसोबत हा कुलचा खायला अधिकच चविष्ट लागतो.
