Join us

खान्देशी मसाला खिचडी करताना लक्षात ठेवा ५ गोष्टी, अस्सल खान्देशी चवीची झणझणीत खिचडी तयार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2023 13:14 IST

How To Make Khandeshi Masala Khichdi : Khandeshi Masala Khichdi Recipe : पिवळ्या खिचडीला विशेष तडका देऊन अधिक पोषक बनवण्यासाठी खानदेशी स्टाईल मसाला खिचडी नक्की ट्राय करुन पाहा.

कामाच्या गडबडीत लवकर स्वयंपाक आवरायचा असल्यास किंवा कधी हलकं - फुलकं खावंसं वाटलं तर आपण झटपट कुकरला खिचडी लावतो. डाळ व  भात एकत्र शिजवून त्यात साजूक तूप, भाज्या आणि मसाले घालून चटकन खिचडी तयार होते. अगदी कमी साहित्यात झटपट होणारी ही रेसिपी अतिशय सोपी, व खायला रुचकर लागते. आपल्याकडे सहसा एखादी व्यक्ती आजारी पडली की त्या व्यक्तीला हमखास मूगाची खिचडी खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. कारण अशक्तपणा, अपचनाच्या त्रासात मूगाची खिचडी विशेष लाभदायी ठरते. परंतु, खिचडी ही फक्त आजारी व्यक्तींसाठी फायदेशीर नसून लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वांनी याचा आहारात समावेश करणं आवश्यक असतं.

खिचडी बनविण्यासाठी वेगवेगळे साहित्य वापरून आपण रुचकर खिचडी बनवू शकतो. दररोजची डाळ, भात एकत्र शिजवून तयार केलेली पिवळी खिचडी खायला कधी कधी कंटाळा येतो. अशावेळी, या पिवळ्या खिचडीला  विशेष तडका देऊन अधिक पोषक बनवण्यासाठी खानदेशी स्टाईल मसाला खिचडी नक्की ट्राय करुन पाहा(How To Make Khandeshi Masala Khichdi : Khandeshi Masala Khichdi Recipe).

साहित्य :- 

१. तांदूळ - १ कप २. तूर डाळ - १/२ कप ३. कोथिंबीर - २ टेबलस्पून ४. लसूण पाकळ्या - ८ ते १० ५. आले - १ इंचाचा तुकडा ६. तेल - ४ टेबलस्पून ७. मोहरी - १ टेबलस्पून ८. जिरे - १ टेबलस्पून ९. कढीपत्ता - ८ ते १० पान १०. कांदा - २ (उभा चिरलेला)११. बटाटा - २ (फोडी चिरुन घेतलेल्या)१२. हिंग - १/२ टेबलस्पून १३. खोबऱ्याचे तुकडे - १ टेबलस्पून १४. शेंगदाणे - २ टेबलस्पून १५. हळद - १/२ टेबलस्पून १६. मीठ - चवीनुसार १७. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून १८. काळा मसाला / गरम मसाला - २ टेबलस्पून १९. पाणी - २, १/२ कप (उकळवून गरम करुन घेतलेले)

कृती :- 

१. सर्वप्रथम तांदूळ व तूर डाळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यांत भिजत ठेवावे. २. मिक्सरच्या एका भांड्यात कोथिंबीर, लसूण पाकळ्या, आले घालून फिरवून घ्यावे. त्याची जाडसर भरड तयार करावी. ३. कुकरमध्ये तेल ओतून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, उभा चिरलेला कांदा व कोथिंबीर,लसूण पाकळ्या, आले यांची जाडसर केलेलं भरड घालून एकजीव करून घ्यावे.

४. आत त्यात हिंग, हळद, खोबऱ्याचे तुकडे, शेंगदाणे, लाल मिरची पावडर, मीठ, बटाट्याच्या फोडी घालाव्यात. ५. त्यानंतर सगळ्यांत शेवटी भिजवून घेतलेले तांदूळ व तूर डाळ एकत्रितरित्या घालावे. आता त्यात अडीच कप गरम पाणी घालून कुकरचे झाकण लावून ३ शिट्ट्या काढून घ्याव्यात. 

खानदेशी मसाला खिचडी खाण्यासाठी तयार आहे. दही, लोणचं, पापड यांसोबत गरमागरम खानदेशी मसाला खिचडी खाण्यासाठी सर्व्ह करावी. कारण या सर्व साईड डिशेसमुळे खानदेशी मसाला खिचडीची चव अधिकच रुचकर लागते.

टॅग्स :अन्नपाककृती