सण असो किंवा सकाळचा नाश्ता, रव्याचा गोड शिरा हा आपला 'कम्फर्ट फूड' आहे. घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच शिरा खूप जास्त आवडतो. रव्याचा शिरा हा इतका कॉमन पदार्थ आहे की तो हमखास घराघरांत केला जातो. 'शिरा' हा एक पदार्थ असला तरी तो तयार करण्याची प्रत्येकाची पद्धत आणि त्याचे प्रकार देखील वेगवेगळे असतात. परंतु तोच तोच नेहमीचा पिवळसर किंवा पांढरा शिरा खाऊन कंटाळा आला असेल, तर नेहमीच्या पारंपरिक शिऱ्याला द्या एक भन्नाट ट्विस्ट... काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल, तर 'कॅरॅमल शिरा' (Caramel Sheera) हा एक उत्तम पर्याय आहे. पारंपरिक शिऱ्यापेक्षा वेगळ्या चवीचा, सुगंधी आणि तोंडात विरघळणारा कॅरॅमल शिरा हा खास प्रकार एकदा नक्की ट्राय करायला हवा(How to make caramel sheera at home).
साखरेला कॅरॅमल करून बनवलेला हा शिरा दिसायला जितका आकर्षक आणि 'रॉयल' वाटतो, तितकीच त्याची चवही लाजवाब असते. साखरेचा सोनेरी रंग आणि त्यातून येणारा खमंग, सुगंधी स्वाद यामुळे शिऱ्याची चव अप्रतिमच (Caramel Sheera Recipe) लागते. खास पाहुण्यांसाठी किंवा पार्टीसाठी जर तुम्हाला हटके गोड पदार्थ बनवायचा असेल, तर हा कॅरॅमल शिरा तुमच्या ताटाची शोभा नक्कीच वाढवेल. कमी साहित्य, सोपी पद्धत आणि नेहमीच्या शिऱ्यापेक्षा वेगळी चव यामुळे हा कॅरॅमल शिरा घरातील प्रत्येकालाच आवडतो. नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचा, तोंडात टाकताच विरघळणारा हा कॅरॅमल शिरा कसा तयार करायचा याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. बारीक रवा - १ कप
२. दूध - १ कप
३. साखर - १ वाटी
४. वेलची पूड - १/२ टेबलस्पून
५. साजूक तूप - २ टेबलस्पून
६. ड्रायफ्रुटस काप - १/२ कप
कृती :-
१. एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक रवा घेऊन तो कोमट दुधात १० ते १५ मिनिटे व्यवस्थित भिजवून घ्यावा. रवा चांगला दुधात भिजवून फुलवून घ्यावा.
२. कढईत साजूक तूप घेऊन ड्रायफ्रुटसचे काप हलकेच तळून घ्यावेत.
३. कढईत साजूक तूप घेऊन त्यात दुधात भिजवलेला रवा घालून तो हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यावा. भाजून घेतलेला रवा कढईतून काढून घ्यावा.
नको डाळ-तांदूळ, नको पीठ आंबवण्याची झंझट! फक्त १५ मिनिटांत करा पांढरीशुभ्र, गुबगुबीत जाळीदार इडली...
४. कढईत पुन्हा साजूक तूप घेऊन त्यात साखर घालावी, तुपात साखर संपूर्णपणे वितळेपर्यंत चमच्याने हलवून घ्यावी. साखर तुपात विरघळवून त्याचे कॅरॅमल तयार करून घ्यावे.
५. तयार कॅरॅमलमध्ये दूध घालून हलवून घ्यावे, मग यात भाजून घेतलेला रवा आणि ड्रायफ्रुटस घालावे.
६. मग चमच्याने हलवून घेऊन त्यात पुन्हा थोडे दूध घालावे.
७. वर झाकण ठेवून एक हलकीशी वाफ काढून घ्यावी.
छान, मस्त गरमागरम, गोड चवीचा कॅरॅमल शिरा खाण्यासाठी तयार आहे.
