'कांदा' हा भारतीय स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा पदार्थ आहे, ज्याच्याशिवाय अनेक पदार्थांची चव अपूर्णच वाटते. रोजची भाजी, आमटी, डाळ कोणताही पदार्थ करायचा म्हणजे कांदा लागतोच. कांदा जेवणात रोज वापरला जात असल्याने, बरेचदा आपण एकाच वेळी जास्त प्रमाणात कांदे खरेदी करून ठेवतो, पण काही दिवसांतच ते खराब होऊ लागतात, त्यांना कोंब फुटतात किंवा ते मऊ पडून सडून जातात. यामुळे आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाते. कांदे जास्त काळ ताजे आणि टिकून राहावेत यासाठी, ते विकत घेण्यापूर्वी योग्य निवड करणे सर्वात महत्त्वाचे असते. बाजारातून कांदे खरेदी करताना आपण अनेकदा घाई करतो आणि चुकीच्या निवडीमुळे कांदे विकत घेऊन ते काही दिवसांतच खराब होतात(kitchen hacks to choose good onions).
कांदे जास्त काळ टिकावेत यासाठी कांदे विकत घेतानाच काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. कांदे विकत घेताना योग्य कांदे निवडून व्यवस्थित घेतले तर साठवणूकही सोपी होते आणि ते जास्त दिवस ताजे राहतात. कांदे निवडताना कोणत्या गोष्टी काळजीपूर्वक तपासाव्यात, कांद्याची गुणवत्ता कशी ओळखावी आणि योग्य कांदे विकत घेतल्यास ते जास्त दिवस कसे टिकतात, याबद्दलच्या खास टिप्स इंस्टाग्रामवरील masalakitchenbypoonam या अकाउंटवरून शेअर करण्यात आल्या आहेत. कांदे खरेदी (onion buying tips for freshness) करताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी तपासाव्यात आणि कशा प्रकारे निवडावे की ते लवकर खराब होऊ नयेत.
बाजारांतून कांदे विकत घेताना लक्षात ठेवा...
१. पूनम देवनानी यांच्या मते, ज्या कांद्याची देठ म्हणजे दांड्याचा वरचा भाग लांब असतो, तो कांदा ताजा असतो. लांब दांड्याचा अर्थ असा आहे की, कांदा अलीकडेच काढला गेला आहे आणि तो अजूनही सुकत आहे. अशा कांद्याचा ताजेपणा जास्त काळ टिकतो. याउलट, ज्या कांद्याचे देठ खूप छोटी किंवा बसलेली दिसते, तो कांदा बहुतेक वेळा जुना असतो आणि त्याच्या आतमध्ये सडण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. अशा कांद्यामध्ये ओलावा असल्याने तो लवकर सडण्याची शक्यता असते.
काळेकुट्ट किचन टॉवेल एका धुण्यातही होतील स्वच्छ! गरम पाण्यात मिसळा १ पदार्थ - दिसतील नव्यासारखे...
२. उत्तम दर्जाचा कांदा हाताने दाबून पाहिला की तो पूर्णपणे टणक आणि घट्टसर लागतो. कांद्याला हलकेच दाबून पाहावे. तो कुठूनही नरम किंवा दबलेला नसावा. नरम किंवा दबलेला कांदा आतून सडलेला किंवा कोंब फुटलेला असण्याची शक्यता असते. याव्यतिरिक्त, कांद्याचे बाहेरचे आवरण सुके, पातळ आणि कागदासारखे असले पाहिजे. जर बाहेरचे आवरण ओले, चिपचिपे किंवा खूप जाड असेल, तर याचा अर्थ कांदा व्यवस्थित सुकवलेला नाही किंवा त्यात ओलावा जमा झाला आहे.
३. कांदे खरेदी करताना जर त्यावर काळ्या बुरशीचा थर असेल तर असे कांदे विकत घेणं शक्यतो टाळा. ही बुरशी सहसा तेव्हाच वाढते जेव्हा कांदा चुकीच्या पद्धतीने साठवला गेला असेल. जर तुमच्याकडून चुकून असा कांदा विकत घेतला गेला, तर त्याला फेकून देण्याऐवजी तो २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि बुरशी असलेला भाग कापून टाका. त्यानंतर तो कांदा पदार्थात व्यवस्थित शिजवून मगच खावा, असा बुरशी आलेला कांदा कच्चा खाणे टाळा. बुरशीव्यतिरिक्त, कोणत्याही प्रकारचे हिरवे, निळे किंवा काळे डाग असलेल्या कांद्याची खरेदी देखील करू नये.
सकाळच्या गार चपात्या कुकरमध्ये एका मिनिटांत करा गरम, पाहा इस्टंट ट्रिक-रोज खा गरमागरम चपात्या...
४. कांदा जर चांगला, ताजा आणि उत्तम दर्जाचा असेल तर जोपर्यंत तो कापला जात नाही तोपर्यंत कांद्याला तीव्र वास येत नाही. जर बाजारात ठेवलेल्या कांद्यांतून तीव्र, सडल्यासारखा किंवा बुरशीचा वास येत असेल, तर याचा अर्थ त्याच्या आसपास असलेला एखादा कांदा खराब होत आहे. जर कांद्यातून हिरव्या रंगाची छोटी पाने, कोंब बाहेर येऊ लागली असतील, तर तो कांदा खरेदी करू नका. कांद्याला जेव्हा कोंब येतो तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की, कांद्याने आपला स्टार्च साखरेत रूपांतरित करण्यास सुरुवात केली आहे आणि त्याची शेल्फ लाईफ पूर्ण झाली आहे, असा कांदा लवकर खराब होऊ शकतो.
५. कांदा त्याच्या आकारमानानुसार, हातात घेतल्यावर जड जाणवला पाहिजे. जर कांदा मोठा दिसत असेल पण वजन कमी वाटत असेल, तर याचा अर्थ तो आतून सुकला आहे किंवा पोकळ झाला आहे. एका वेळी वापरण्यासाठी जवळजवळ समान आकाराचे कांदे निवडणे चांगले असते. यामुळे अन्नपदार्थ शिजवताना सर्व कांदे एकाच वेळी आणि समान पद्धतीने शिजण्यास मदत होते.
