हिवाळ्यात मिळणारी केशरी रंगाची रसरशीत आंबट - गोड चवीची संत्री खायला प्रत्येकालाच आवडतात. बाजारांत थंडीच्या दिवसांत संत्री फार मोठ्या प्रमाणावर विकायला येतात. या दिवसांत आपण मोठ्या हौसेने चवीने संत्री खाता येतील म्हणून विकत घेतो घेतो खरे, पण ही संत्री चवीला आंबट लागतील की गोड याचा नेमका अंदाज बांधणे थोडे अवघडच असते...अनेकदा संत्री विकत घेतली की ती हमखास चवीला आंबटच लागतात. संत्री चवीला आंबट लागली की ती खाण्याचा मूडच खराब होतो. संत्र कापून किंवा सोलून पाहिल्याशिवाय ती गोड आहे की आंबट, हे आधीच कसं ओळखायचं हा प्रश्न अनेकांना पडतो(how to choose juicy and sweet orange santra before buying).
अनेकदा आपण खूप निवडून संत्री आणतो, पण घरी सोलून खाताना ती चवीला आंबट लागतात किंवा त्यात रसच नसतो. अशावेळी संत्री न सोलता किंवा न चाखता केवळ हातात घेऊन ती गोड आहेत की नाही हे कसं ओळखावं? ही एक कला आहे. संत्र्याचा रंग, त्याचा पोत आणि वजन यावरून आपण त्याच्या चवीचा अचूक अंदाज लावू शकतो. काही सोप्या आणि खास टिप्स आजमावून संत्र हातात घेऊन किंवा न सोलताही त्याची चव ओळखता येते, या टिप्स नेमक्या कोणत्या ते पाहूयात...ज्यामुळे पुढच्या वेळी संत्री घेताना (how to choose juicy and sweet orange) तुमची फसवणूक होणार नाही...
संत्री आंबट आहेत की गोड नेमकं कसं ओळखावं ?
१. वजनावरून करा पारख :- योग्य संत्री निवडण्याचा सर्वात अचूक मार्ग म्हणजे त्याचे वजन पाहणे. जेव्हा तुम्ही संत्री खरेदी करता, तेव्हा एकाच आकाराची दोन संत्री दोन्ही हातात घेऊन त्यांची तुलना करा. जे संत्र त्याच्या आकाराच्या तुलनेत हाताला जास्त जड लागते, त्यात रसाचे प्रमाण भरपूर असते. याचा अर्थ असा की, संत्र्याच्या आतील पेशी रसाने पूर्णपणे भरलेल्या आहेत, ज्यामुळे ते संत्र चवीला गोड आणि ताजे असते. याउलट, आकाराने मोठे असूनही जर संत्र वजनाला हलकं लागत असेल, तर ते आतून सुकलेले किंवा केवळ चोथा असण्याची शक्यता जास्त असते.
२. संत्र्याच्या सालाची जाडी तपासून पाहा :- संत्र्याची साल त्याच्या चवीबद्दल बरेच काही सांगून जाते. संत्र्याची साल खूप जास्त जाड नसावी. ज्या संत्र्यांची साल पातळ आणि हाताला स्पर्श करायला गुळगुळीत असते, ती संत्री सामान्यतः जास्त गोड आणि रसाळ असतात. पातळ साल असणे म्हणजे त्यात फळाचा गर आणि रस भरपूर असतो. याउलट, जाड साल हे लक्षण आहे की फळामध्ये सालीचा भाग जास्त आहे आणि रसाचे प्रमाण कमी. खूप जास्त जाड साल असलेली संत्री कधीकधी चवीला बेचव किंवा आंबट निघू शकतात.
३. डागविरहित संत्री निवडा :- संत्री खरेदी करताना त्याच्या वरच्या भागाचे नीट निरीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. संत्र्यावर कोणत्याही प्रकारचे डाग नसावेत. जर संत्र्यावर काळ्या किंवा तपकिरी रंगाचे डाग असतील, तर याचा अर्थ असा होतो की ते संत्रं आतून सडायला सुरुवात झाली आहे किंवा ते खूप जुने झाले आहे. अनेकदा फळांवर पांढऱ्या पावडरसारखा थर दिसतो, जो बुरशी किंवा कीटकनाशकांचा अंश असू शकतो. त्यामुळे नेहमी स्वच्छ, चमकदार आणि एकसारखा केशरी रंग असलेले संत्रंच विकत घ्यावे अशी संत्री ताजी आणि खाण्यासाठी सुरक्षित असतात.
४. गडद केशरी रंग उत्तम :- संत्र्याचा रंग ते फळ किती पिकलेले आहे हे सांगतो. काहीवेळा थोडी हिरवट दिसणारी संत्रीही गोड असू शकतात, तरीही उत्तम संत्र हे पूर्णपणे गडद केशरी रंगाचे असते. जर संत्र्यावर ठिकठिकाणी पिवळसरपणा किंवा फिकट हिरवा रंग दिसत असेल, तर याचा अर्थ ते पूर्णपणे पिकलेले नाही. अशी संत्री चवीला आंबट असू शकतात. गडद रंगाची संत्री सूर्यप्रकाशामध्ये झाडावर नीट पिकलेली असतात, त्यामुळे त्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असते आणि ती चवीला गोड लागतात.
रात्री जेवताना वाटीभर ‘ही’ डाळ खा, सुटलेलं पोट होईल सपाट-मांड्याही दिसतील सुडौल-वजन झरझर कमी...
५. वासावरून ओळखा :- गोड आणि ताज्या संत्र्याचा स्वतःचा एक विशिष्ट सुगंध असतो. संत्र्याची गुणवत्ता तपासण्यासाठी ते उचलून त्याच्या देठाच्या भागाकडून वास घेऊन पहा. जर संत्र्यातून एक प्रकारचा ताजा, गोड आणि सौम्य आंबट असा संमिश्र सुगंध येत असेल, तर ते संत्रं खरेदीसाठी अगदी योग्य आहे. जर संत्र्याला कोणताही वास येत नसेल किंवा त्याचा वास काहीसा शिळा वाटत असेल, तर समजून जा की ते फळ खूप दिवसांपूर्वी झाडावरून तोडलेले आहे आणि आता त्याची नैसर्गिक चव कमी झाली आहे.
६. स्पर्शावरून ओळखा फळं :- संत्री निवडताना ती हलक्या हाताने दाबून पाहणे देखील महत्त्वाचे आहे. संत्र्याचा पोत तुम्हाला त्याच्या गुणवत्तेबद्दल अचूक माहिती देतो. चांगले आणि रसाळ संत्रं दगडासारखं कडक नसावं आणि खूप जास्त मऊ किंवा लिबलिबीतही नसावं. बोटांनी हलकं दाबल्यावर ते पुन्हा आपल्या मूळ आकारात आलं पाहिजे.
