Join us

गरमागरम मऊभात तूप-मीठ-लिंबू आणि मेतकूट! मेतकुटाची पारंपरिक रेसिपी, तोंडाला पाणी सुटेल असा बेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2023 18:37 IST

How To Make Metkut : Recipe : मेतकूट म्हणजे घरी सहज उपलब्ध असणाऱ्या धान्यांपासून सहज बनवता येणारी ही एक कोरडी चटणी आहे.

उन्हाळ्यामध्ये आपण पुढील वर्षभर पुरतील इतकी वेगवेगळ्या प्रकारची वाळवण घालतो. यात मुख्यतः लोणची, पापड, कुरडया, साबुदाण्याच्या फेण्या, मसाले यांसारख्या साठवणीच्या पदार्थांचा समावेश असतो. या वाळवणांच्या पदार्थांनमध्ये हमखास केला जाणारा मेतकूट हा एक लोकप्रिय पदार्थ आहे. मेतकूट हे दोन ते तीन प्रकारच्या डाळींपासून तयार केले जाते. कधी आवडीची भाजी नसल्यास तोंडी लावायला म्हणून किंवा गरमागरम भात, भाकरीला लावून मेतकूट खाऊ शकतो. महाराष्ट्रातील बऱ्याच घरांमध्ये वर्षभर पुरेल इतके मेतकूट तयार करून स्टोअर केले जाते. मेतकूट म्हणजे घरी सहज उपलब्ध असणाऱ्या धान्यांपासून सहज बनवता येणारी ही एक कोरडी चटणी आहे. मेतकूट बनवण्यासाठीचे साहित्य व कृती काय आहे ते पाहूयात(How To Make Metkut : Recipe).

साहित्य :- 

१. उडीद डाळ - ३ टेबलस्पून २. गहू रवा (दलिया) - २ टेबलस्पून ३. मूग डाळ - २ टेबलस्पून ४. हरभरा डाळ - २ टेबलस्पून ५. तांदूळ - २ टेबलस्पून ६. फुटाणा डाळ - ६ टेबलस्पून ७. धने - १ टेबलस्पून ८. जिरे - १ टेबलस्पून ९. मेथी दाणे - १/४ टेबलस्पून १०. काळीमिरी - १० ते १२ ११. लाल मिरची - ३ ते ४ १२. हळद - १/२ टेबलस्पून १३. हिंग - १/२ टेबलस्पून 

nutribit.app या इंस्टाग्राम पेजवरून मेतकूट कसे बनवायचे याचे साहित्य व कृती शेअर करण्यात आले आहे. 

कृती :- 

१. सर्वप्रथम एक पॅन घेऊन त्यात वरील सगळ्या डाळी एका वेळी एक या पद्धतीने पॅनमध्ये कोरड्या भाजून घ्याव्यात. २. त्यानंतर मेथीचे दाणे, धणे, जिरे, काळीमिरी, लाल मिरच्या हे सगळे एकत्रित भाजून घ्यावेत. ३. आता भाजून घेतलेल्या सगळ्या डाळी व मेथीचे दाणे, धणे, जिरे, काळीमिरी, लाल मिरच्या हे सर्व एकत्र करून घ्यावेत. ४. हे मिश्रण गार होऊ द्यावे. 

५. मिश्रण गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात आपल्या आवडीनुसार हळद व हिंग घालावे. ६. आता हे मिश्रण मिक्सरमध्ये एकदम बारीक पूड होईपर्यंत वाटून घ्यावे. 

७. आता एक चाळणी घेऊन मिक्सरमधील हे तयार झालेले मेतकूट बारीक चाळणीतून चाळून घ्यावे. ८. चाळल्यानंतर तयार झालेले मेतकूट एका हवाबंद बरणीत भरून व्यवस्थित स्टोअर करून ठेवावे. 

गरमागरम भातावर तुपाची धार सोडून त्यावर मेतकूट घालून खाणे ही अनेकांची आवडती डिश आहे.

मेतकूट बनविण्याच्या काही पारंपरिक रेसिपी व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. 

टॅग्स :अन्नपाककृती