पुरणपोळी सगळ्यांनाच आवडते. पण उष्णतेचा त्रास असणारे इच्छा असूनही पुरणपोळीवर ताव मारू शकत नाहीत. अशा वेळी उत्तरेकडे बनवली जाणारी गुलकंद गुजिया अर्थात गुलकंदाची करंजी रेसिपी! नक्कीच सर्वांच्या पसंतीस पडेल आणि पोटाला थंडावाही देईल. यंदा १३ मार्च रोजी होळी (Holi 2025) आणि १४ मार्च रोजी धूलिवंदन! महाराष्ट्रात होळी आणि पुरणपोळी हे समीकरण असतेच. ज्यांच्याकडे पुरण पोळीला पर्याय चालत नाही त्यांनी धूलिवंदन किंवा रंगपंचमीला गुलकंद गुजिया करायला हरकत नाही.
साहित्य : २ कप मैदा, २ चमचे रवा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा मीठ, अर्धा वाटी ओलं खोबरं, अर्धा कप मावा, एक कप गुलकंद, ड्रायफ्रूट, तळणीसाठी तेल वा तूप
गुलकंद गुजिया ही रेसेपी बनवायला सोपी, चविष्ट आणि पौष्टिक आहे. शिवाय त्यात गुलकंद वापरल्यामुळे उन्हाळ्यात ही रेसेपी तुमच्या तना-मनाला नक्कीच थंडावा देईल. गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर मिसळून गुलकंद तयार केला जातो आणि तो आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतो. गुलकंद घरी तयार केला नसेल तरी बाजारातील विकतचा गुलकंद आणून ही रेसेपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. वाचा संपूर्ण रेसेपी-
गुजियाची पारी :
- सर्व प्रथम गुजियाची अर्थात करंजीची पारी तयार करण्यासाठी पीठ मळून घ्या.
- यासाठी एका परातीत दोन वाट्या मैदा घेऊन त्यात वितळलेले तूप, रवा, बेकिंग पावडर घालून चांगले मळून घ्या.
- जेव्हा तुम्ही पीठ हाताने घासता तेव्हा ते ब्रेडक्रंबसारखे दिसू लागते.
- आता थोडं थोडं पाणी घालून छान आणि गुळगुळीत पीठ मळून घ्या.
- लक्षात ठेवा की आपले पीठ खूप घट्ट किंवा खूप मऊ नसावे.
- २० मिनिटे पीठ झाकून बाजूला ठेवा, जेणेकरून ते सेट होईल.
गुजियाचे मिश्रण :
- कढईत २५० ग्राम मावा घ्या आणि ढवळत शिजवा.
- जेव्हा मावा थोडा कोरडा आणि हलका रंग दिसू लागतो तेव्हा समजून घ्या की तुमचा मावा भाजला गेला आहे. मावा थंड होऊ द्या.
- आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये गुलकंद, ओलं खोबरं आणि मावा घालून व्यवस्थित एकत्र करा. मिश्रण तयार!
गुलकंद गुजिया रेसेपि :
- २० मिनिटांनंतर, १ मिनिट पुन्हा पीठ मळून घ्या.
- एका वाटीत एक चमचा मैदा घालून त्यात गरजेनुसार पाणी घालून पातळ पेस्ट बनवा.
- पिठाचे छोटे गोळे तयार करून पुरीच्या आकारात लाटून घ्या.
- या पुऱ्या गुजियाच्या साच्यात ठेवा आणि १ चमच्याने गुलकंद सारण भरून घ्या.
- कडांवर पातळ पेस्ट लावा आणि साचा बंद करा. कडा वरून जास्तीचे पीठ काढा.
- त्याच पद्धतीने सगळ्या गुजिया तयार करून प्लेटमध्ये ठेवा.
- मिश्रण जास्त किंवा कमी नसावे हे लक्षात ठेवा.
- जास्त भरले तर गुजिया फाटते आणि कमी भरली तर रिकामी राहते.
- आता एका कढईत तेल गरम करा आणि हळूहळू या गुजिया घाला आणि दोन्ही बाजूंनी गुलाबीसर होईपर्यंत तळून घ्या आणि नंतर टिश्यू पेपरवर काढून घ्या गार झाल्यावर गुलाबाच्या पाकळ्यांनी डेकोरेट करून सर्व्ह करा.