पावभाजी म्हटलं की डोळ्यासमोर येते की लालभडक, लोण्याने माखलेली आणि झणझणीत भाजी. अगदी लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांच्या आवडीची डिश. पण नेहमीची तीच ती लाल पावभाजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल, तिला आपण एक 'हेल्दी आणि ग्रीन ट्विस्ट' देऊ शकतो.(Haribhari pav bhaji recipe Marathi) उन्हाळ्यात किंवा सणासुदीला जेव्हा आपल्याला काहीतरी वेगळं आणि चविष्ट खावसं वाटतं, तेव्हा 'हरीभरी पावभाजी' हा एक उत्तम पर्याय ठरतो.(Dhaba style green pav bhaji recipe)
ही पावभाजी केवळ दिसायलाच वेगळी नाही, तर ती चवीलाही तितकीच अप्रतिम लागते. यात सर्व हिरव्या भाज्या घालून तिची चव वाढवली जाते. आपल्या मुलांना हिरव्या पालेभाज्या आवडत नसतील तर अशी आगळी-वेगळी रेसिपी नक्की ट्राय करुन बघा. ढाब्यावर मिळणारी ही हरीभरी पावभाजी कशी बनवायची ते पाहूया. यासाठी लागणारे कृती आणि साहित्य जाणून घ्या.
साहित्य
बारीक चिरलेली शिमला मिरची - १ कप
आले-लसूण- हिरवी मिरची पेस्ट - १ चमचा
बारीक चिरलेला कांदा - १ वाटी
तेल - २ चमचे
हिरवे वाटाणे - १ वाटी
उकडलेला बटाटा - १ वाटी
पालक प्युरी - १ वाटी
गरम पाणी - १ कप
गरम मसाला - १ चमचा
पावभाजी मसाला - १ चमचा
धने पावडर - १ चमचा
मीठ - चवीनुसार
बटर - १ चमचा
कोथिंबीर - आवश्यकतेनुसार
बारीक चिरलेला लसूण - १ चमचा
लाल तिखट - १ चमचा
कृती
1. सगळ्यात आधी पॅनमध्ये तेल गरम करुन घ्या. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा परतवून घ्या. नंतर त्यात आले-लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट घालून परतवून घ्या. कांद्याचा रंग बदलल्यानंतर त्यात शिमला मिरची घालून व्यवस्थित परतवा.
2. यामध्ये आता हिरवे वाटाणे घाला. नंतर उकडलेला बटाटा स्मॅश करुन घ्या. नंतर संपूर्ण मिश्रण व्यवस्थित स्मॅशरने घोटून घ्या. त्यात वरुन पालक प्युरी घालून मिक्सर करा. कपभर गरम पाणी घालून चांगले एकजीव होऊ द्या.
3. यामध्ये आता गरम मसाला, पावभाजी मसाला, धने पावडर, मीठ घालून मिक्स करा. उकळी आल्यानंतर त्यात बटर घाला. चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्या. वरुन कोथिंबीर पेरा.
4. फोडणी पात्रात तेल गरम करुन त्यात लसूण आणि लाल तिखट घालून फोडणी तयार करा. ही फोडणी भाजीमध्ये घाला. गरमागरम खा हरीभरी पावभाजी.
