रेवती श्रोत्रीय
गुढीपाडव्याला अनेकांच्या घरी श्रीखंड-पुरीचा बेत ठरलेलाच असतो. काहीजण विकत आणतात, तर काहीजण घरी श्रीखंड बनवण्याचा आनंद घेतात. घरी चक्का करून त्यात आवडीप्रमाणे साखर घालून ७-८ तास ठेवायचं आणि पुरणयंत्रातून काढायचं, या पद्धतीने साधारणपणे श्रीखंड केलं जातं. आता अनेकजण म्हणतातही की बाजारात मिळतं उत्तम श्रीखंड तर मग उगीच कशाला घरी करत बसा, ते नीट नाहीच जमलं, आंबटच झालं, पातळच झालं तर काय मजा? मुख्य म्हणजे एवढा व्याप कोण करणार? प्रश्न काही चुकीचे नाहीत पण वर्षातून एकदा कधीतरी घरी श्रीखंड करुन खाण्यातही मजा असते. आणि श्रीखंड करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात. आता तुम्ही पाकातलं श्रीखंड हा श्रीखंडाचा प्रकार कधी ऐकला आहे का? करुन पाहा, अत्यंत चविष्ट असं हे श्रीखंड वर्ष नक्की गोड करते.
साखरेचा गोळीबंद पाक करून त्यात चक्का घालून केलं जातं ते पाकातलं श्रीखंड. नुसतं केलेलं श्रीखंड फ्रिजमध्ये ठेवलं तरी आंबट होतं. पण गरम पाकात चक्का घालून ढवळला की तो नंतर आंबट होऊच शकत नाही. फ्रिजमध्ये ठेवलं तरी त्याची चव बदलत नाही शिवाय, टिकतंही बराच काळ. त्यामुळे यंदाच्या पाडव्याला अशाप्रकारे श्रीखंड करण्याची पाहा कृती.
साहित्य:
अर्धा किलो चक्का, अर्धा किलो साखर, जायफळ, केशर.
कृती:
1. आधी दुधात केशर घालून त्यातच जायफळ पूड एकत्र करून ठेवावी.
2. चक्का पुरण यंत्रातून काढून त्यातील गाठी मोडून घ्याव्यात. किंवा तुम्ही ते हॅण्ड मिक्सीने पण करू शकता.
3. मग साखरेचाचा पाक करण्यासाठी साखरेच्या निम्मे पाणी आणि साखर कढईत घालून त्याचा गोळीबंद पाक करावा.
4. गॅस बंद करून त्यात लगेचच केशर जायफळ चक्का घालून छान एकत्र करावे.
5. गार करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवावे. आपले पाकातले श्रीखंड तयार आहे.
अशाप्रकारे श्रीखंड करुन पाहा, चवही छान आणि टिकतेही उत्तम. घरी करण्याचाही आनंद.