Join us  

Ganesh Jayanti Special : बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदकांचे २ सोपे प्रकार, पाहा झटपट होणाऱ्या रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2024 8:45 AM

Ganesh Jayanti Special 2 Easy Modak Recipe : वर्कींग डेच्या दिवशी बाप्पाचा उपवास सोडताना करा मोदकांचे खास प्रकार...

माघ महिन्यातील चतुर्थी ही गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. गणपती बाप्पा हे आराध्यदैवत असल्याने गणेशाची अतिशय भक्तिभावाने पूजा केली जाते. माघी जयंतीच्या निमित्ताने बाप्पाचे भक्त घरी, गणेश मंडळे, गणपतीचे मंदिर, सोसायटी याठिकाणी गणपतीची मनोभावे पूजाअर्चा करतात. या दिवशी बाप्पाला त्याच्या आवडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवून त्याची मनोभावे आरती केली जाते. यंदा ही चतुर्थी मंगळवारी आल्याने अंगारकी योग आला आहे. चतुर्थीला दिवसभर उपवास करुन चंद्रोदयाच्या वेळी उपवास सोडण्याची रीत आहे. गणेश जयंतीच्या निमित्ताने तुम्हीही बाप्पाची पूजा करुन त्याला मोदकांचा नैवेद्य करणार असाल तर आज आपण मोदकांचे आगळेवेगळे पण झटपट होणारे असे २ प्रकार पाहणार आहोत (Ganesh Jayanti Special 2 Easy Modak Recipe). 

(Image : Google)

१. गुलकंद कोकोनट मोदक

सुक्या खोबऱ्याचा कीस करायचा. घराच करणे शक्य नसेल तर बाजारातही हा किस सहज उपलब्ध असतो. २ वाट्या खोबऱ्याचा कीस, त्यामध्ये २ चमचे खसखस, अर्धी वाटी काजू आणि बदामाची पावडर घालायची. यामध्ये साधारण अर्धी वाटी गुलकंद घालून हे सगळे मिश्रण नीट एकजीव करावे. गुलकंद पुरेसा गोड असतो पण आवश्यकता वाटल्यास तुम्ही आवडीप्रमाणे पिठीसाखर घालू शकता.  हे सगळे मिश्रण नीट एकजीव झाल्यावर मोदकांच्या साच्यात घालून त्याचे एकसारखे मोदक करायचे. या मोदकांना गॅस लावायचीही आवश्यकता नसल्याने ते अतिशय झटपट आणि ऐनवेळी होतात. तोंडात ठेवताच विरघळणारे हे मोदक चवीलाही फारच छान लागतात. 

(Image : Google)

२. कणकेचे तळणीचे किंवा उकडीचे मोदक 

तळणीचे मोदक करायला सोपे असल्याने बहुतांश जण चतुर्थीच्या दिवशी ते करण्याला पसंती देतात. ओल्या खोबऱ्याचा कीस, आवडीप्रमाणे सुकामेवा, पिठीसाखर, खसखस, वेलची पूड असे सगळे घालून सारण तयार करायचे आणि कणकेची पुरी करुन त्यामध्ये सारण भरुन हे मोदक वळायचे. हे मोदक तळले किंवा जाळीमध्ये उकडून घेतले तरी छान होतात. हे मोदक करायलाही फारसा वेळ लागत नसल्याने गणेश जयंतीला वर्कींग डे च्या दिवशी तुम्ही हे मोदक नक्की करु शकता.    

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.गणेश चतुर्थी रेसिपी