डोसा. हा पदार्थ दक्षिण भारतीय, मात्र तुम्हाला कुणी प्रश्न विचारला की भारतात उत्तरेत डोसा चांगला मिळतो की दक्षिणेत? तर..
कुणीही म्हणेल की दक्षिणेतच चांगला मिळणार, मात्र काही जणांचं ठाम मत आहे की बंगळूरुपेक्षा दिल्लीत किंवा मुंबईत डोसा चांगला मिळतो. आता असं कुणी म्हणालंच तर वाद अटळ. सोशल मीडियात असे पदार्थावरुन वाद तर कायमच रंगतात.
आमच्याच इथली मिसळ भारी, आमचाच वडापाव, आमचीच दाबेली, आमच्याकडचीच भेळ ते उकडीचे-तळणीचे मोदक हे सारं आमच्याकडेच भारी मिळतं असं म्हणत हमरीतुमरीवर येणारे लोक काही जगात कमी नाही.
इट लोकल अशी एक विचारसरणी असताना आता नव्या जागतिकीकरणाच्या काळात सर्व पदार्थ सर्वत्र मिळतात. आणि आमच्याच भागातले अमूक पदार्थ चांगले यावर लोक वाद घालतात. स्थानिक चवीचा आणि दुसरीकडे मिळणाऱ्या त्याच पदार्थाचा काही मेळ असेलच असं नाही. या सगळ्याला ‘मायग्रेटेड फूड’ असाही एक शब्द आहे. पण ती व्यापक कल्पना झाली. अन्नाचा प्रवास माणसांसोबत पिढ्यांपिढ्या होतोच आहे..
त्यात अजून परिणामकारक घटक असतात ते म्हणजे माध्यमं आणि बाजारपेठ. माणसांचे अन्नप्राधान्यक्रम अनेक गोष्टींमुळे बदलतात.
मराठी लग्नात सर्रास पनीरच्या भाज्या आणि दाल मखनी दिसू लागले. चायनिजचे स्टॉल लागू लागले. मोमो तर आता सर्व शहरांत मिळतात. नूडल्स मिळतात. उकडीचे मोदक देशभर प्रसिध्द होतात. मुंबईचा वडापाव पाकिस्तानात मिळतो आणि त्याचे रिल्स व्हायरल होतात.
त्यापुढे अजून एक प्रकार आता जातो त्याला म्हणतात फ्यूजन फूड. म्हणजे दोन सर्वस्वी वेगळ्याच भागातले पदार्थ एकमेकांशी दोस्ती करत भलताच पदार्थ तयार होतो. उत्तरेतलं पनीर, चिनी पदार्थातली शेजवान चटणी आणि दक्षिणी डोसा असं मिळून पनीर शेजवान डोसाही आता मिळतो आणि तो आता अनेकांना आवडतोही.
जगभरात हे घडते आहे. माणसांसह पदार्थांचं स्थलांतर आणि चवी एकत्र येत भलताच पदार्थ तयार होणं. काहींचा अर्थातच या फ्यूजन फूडला विरोधच आहे.
त्यामुळे अस्सल चव जाते अशी चर्चाही आहे. पण खाद्यपदार्थही माणसांप्रमाणेच बदलतात आणि नव्या चवींचा स्वीकार करता करता नव्या पदार्थांचाही स्वीकार माणसं करतात. त्यामुळे स्थानिक अन्नपदार्थांवर अतिक्रमण होते. त्यामुळे स्थानिक पदार्थच गायब होतात असाही मुद्दा आहेच. उदा. मराठी लग्नात पूर्वी असायचे ते पदार्थ आज अनेक लग्नात दिसत नाहीत.
हे चांगले की वाईट?
या प्रश्नावर चर्चा होऊच शकते. जगभर होते आहे. पण ज्याला जे आवडते, जसा प्रभाव पडतो भवतालाच, ज्याची जशी ऐपत तशी खाद्यनिवड माणसे करतात हे नाकारता येत नाहीच. फ्यूजन फूड हे त्याचेच चित्र!