Join us

Food Recipe: घरचे दुधीभोपळ्याला नाक मुरडतात? करून बघा चटपटीत दुधी मुठीया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2025 13:19 IST

Food Recipe: घरच्या साहित्यात बनणारा हा गुजराती चटपटीत पदार्थ एकदा करून बघा, घरचे वारंवार करायला लावतील हे नक्की!

घरच्यांसाठी नावडत्या असणाऱ्या भाज्यांची पोषणमूल्य पाहता ती कोणत्या पद्धतीने गळी उतरवायची हा गृहिणींसमोर मोठा प्रश्न असतो. मग त्या विविध रेसिपीच्या माध्यमातून भाज्या घरच्यांच्या पोटात कशा जातील यासाठी शक्कल लढवत असतात. दुधी भोपळ्याची भाजी नावडणारेही अनेक जण असतात. त्यांना ही गुजरातची पारंपरिक डिश बनवून खाऊ घाला, चाटून पुसून खातील. बरं याला मुठीया का म्हणतात? तर त्या मुठीने वळल्या जातात म्हणून! चला तर पाहूया रेसेपी!

दुधी मुठीया बनवण्यासाठी साहित्य : 

दुधी भोपळा- १ मध्यम आकाराचागहू पीठ (कणिक)- १ कपबारीक रवा - १ कपबेसन- १ कपआले- २ इंचहिरव्या मिरच्या - 2लाल तिखट/ मिरची पूड- १ टिस्पूनतीळ- १/२  टिस्पूनजिरे- १ टिस्पूनधणे पूड - १/२  टिस्पूनहळद - १/२  टिस्पूनहिंग - १/२  टिस्पूनबडीशेप- १/२  टिस्पूनलिंबू रस - २ टिस्पूनसाखर- एक चिमूटभरकोथिंबीर, चिरून- १/२  कपखायचा सोडा (बेकिंग सोडा) - १/२  टिस्पूनमीठ-चवीप्रमाणेतेल- २ टीस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर 

फोडणीसाठी साहित्य :

तेल- ३ ते ४ टेबलस्पूनकढीपत्ता- २ डहाळ्यामोहोरी- १ टिस्पूनतिळ - २ टीस्पूनहिंग- १/४  टिस्पून

कृती:

  • आले, हिरव्या मिरच्या आणि जिरे एकत्र भरड वाटा.
  • दुधी किसून  आणि पिळून घ्या. पण हे दुधीचे पाणी टाकू नका. नंतर कणिक मळण्यासाठी उपयोगी पडेल.
  • दुधी, गव्हाचे पीठ, रवा, बेसन, जिरे-आले-हिरवी मिरचीचा ठेचा, हळद, बडीशेप, लिंबाचा रस, साखर, कोथिंबीर, सोडा, हिंग, हळद व मीठ  परातीत एकत्र करा. चांगले मिक्स करावे.
  • बाजूला काढून ठेवलेले दुधीचे पाणी थोडे थोडे घालून कणिक माळून घ्या. तेल घालून पुन्हा छान मळून घ्या. 
  • कणिक फार मऊ  नको आणि फार घट्टही  नको .
  • हातावर थोडे तेल लावून कणकेचे ६ भाग करा. प्रत्येक भागाचा लांबट (दंडगोलाकार) उंडा तयार करा.
  • स्टीलच्या चाळणीला  तेलाचा हात लावा आणि सर्व उंडे चाळणीत ठेऊन मोदकपात्रात किंव्हा इतर स्टीमरमध्ये २० ते २५ मिनिटे वाफऊन घ्या. 
  • मायक्रोवेव्ह स्टीमर पण वापरू शकता.
  • थोडे थंड झाल्यावर अर्धा इंच रुंदीचे काप करा.
  • कढईत तेल गरम करून मोहरी, कढीपत्ता, तिळ आणि हिंग टाकून फोडणी करावी. 
  • त्यात मुठीयाचे काप तुकडे टाकून २ ते ३ मिनीटे मध्यम आचेवर खमंग परतून घ्या.
  • वरून कोथिंबीर टाकुन सजवा. 

दुधीचे चटपटीत मुठीया तयार!

टॅग्स :अन्नपाककृती