घरच्यांसाठी नावडत्या असणाऱ्या भाज्यांची पोषणमूल्य पाहता ती कोणत्या पद्धतीने गळी उतरवायची हा गृहिणींसमोर मोठा प्रश्न असतो. मग त्या विविध रेसिपीच्या माध्यमातून भाज्या घरच्यांच्या पोटात कशा जातील यासाठी शक्कल लढवत असतात. दुधी भोपळ्याची भाजी नावडणारेही अनेक जण असतात. त्यांना ही गुजरातची पारंपरिक डिश बनवून खाऊ घाला, चाटून पुसून खातील. बरं याला मुठीया का म्हणतात? तर त्या मुठीने वळल्या जातात म्हणून! चला तर पाहूया रेसेपी!
दुधी मुठीया बनवण्यासाठी साहित्य :
दुधी भोपळा- १ मध्यम आकाराचा
गहू पीठ (कणिक)- १ कप
बारीक रवा - १ कप
बेसन- १ कप
आले- २ इंच
हिरव्या मिरच्या - 2
लाल तिखट/ मिरची पूड- १ टिस्पून
तीळ- १/२ टिस्पून
जिरे- १ टिस्पून
धणे पूड - १/२ टिस्पून
हळद - १/२ टिस्पून
हिंग - १/२ टिस्पून
बडीशेप- १/२ टिस्पून
लिंबू रस - २ टिस्पून
साखर- एक चिमूटभर
कोथिंबीर, चिरून- १/२ कप
खायचा सोडा (बेकिंग सोडा) - १/२ टिस्पून
मीठ-चवीप्रमाणे
तेल- २ टीस्पून
बारीक चिरलेली कोथिंबीर
फोडणीसाठी साहित्य :
तेल- ३ ते ४ टेबलस्पून
कढीपत्ता- २ डहाळ्या
मोहोरी- १ टिस्पून
तिळ - २ टीस्पून
हिंग- १/४ टिस्पून
कृती:
- आले, हिरव्या मिरच्या आणि जिरे एकत्र भरड वाटा.
- दुधी किसून आणि पिळून घ्या. पण हे दुधीचे पाणी टाकू नका. नंतर कणिक मळण्यासाठी उपयोगी पडेल.
- दुधी, गव्हाचे पीठ, रवा, बेसन, जिरे-आले-हिरवी मिरचीचा ठेचा, हळद, बडीशेप, लिंबाचा रस, साखर, कोथिंबीर, सोडा, हिंग, हळद व मीठ परातीत एकत्र करा. चांगले मिक्स करावे.
- बाजूला काढून ठेवलेले दुधीचे पाणी थोडे थोडे घालून कणिक माळून घ्या. तेल घालून पुन्हा छान मळून घ्या.
- कणिक फार मऊ नको आणि फार घट्टही नको .
- हातावर थोडे तेल लावून कणकेचे ६ भाग करा. प्रत्येक भागाचा लांबट (दंडगोलाकार) उंडा तयार करा.
- स्टीलच्या चाळणीला तेलाचा हात लावा आणि सर्व उंडे चाळणीत ठेऊन मोदकपात्रात किंव्हा इतर स्टीमरमध्ये २० ते २५ मिनिटे वाफऊन घ्या.
- मायक्रोवेव्ह स्टीमर पण वापरू शकता.
- थोडे थंड झाल्यावर अर्धा इंच रुंदीचे काप करा.
- कढईत तेल गरम करून मोहरी, कढीपत्ता, तिळ आणि हिंग टाकून फोडणी करावी.
- त्यात मुठीयाचे काप तुकडे टाकून २ ते ३ मिनीटे मध्यम आचेवर खमंग परतून घ्या.
- वरून कोथिंबीर टाकुन सजवा.
दुधीचे चटपटीत मुठीया तयार!