महाशिवरात्रीचा (Mahashivratri) उपवास म्हणजे वर्षभराच्या उपवासांपैकी एक महत्त्वाचा उपवास. आपल्याकडे उपवास म्हणजे कमी खाणे नाही तर उपवास म्हणजे (Fasting Tips) एरवी खाल्ले जात नसलेले उपवासाचे पदार्थ दणकून खाणे. यामध्ये साबुदाणा, बटाटा, रताळी, दाणे यांसारखे पदार्थ तसेच तळलेले साबुदाण्याचे वडे, उपवासाचा चिवडा, वेफर्स, पापड्या अशा पदार्थांचा आवर्जून समावेश असतो. अनेकदा आवडतात म्हणून हे पदार्थ भरपूर प्रमाणात खाल्ले जातात. एकादशी दुप्पट खाशी असं आपल्याकडे म्हणतात ते काही खोटं नाही. पण अशाप्रकारे एकाच दिवशी वातूळ, तेलकट पदार्थ एकदम खाल्ले तर तब्येतीला त्रास होऊ शकतो.
अनेकांना उपवासानंतर पित्त होणे, मळमळ किंवा उलट्या होणे असे प्रकार होतात. काही जण कडक उपवास करतात. किंवा सारखा साबुदाणा खाणे चांगले नसल्याने बेतानेच खातात. त्यामुळे पोट रिकामे राहते, रात्रीच्या झोपेनंतर मध्ये बराच काळ गेलेला असतो. अशावेळी पोट आणखी काही वेळ रिकामे ठेवणे योग्य नाही. त्यामुळे नाश्ता आवर्जून करायला हवा. पण पोट रिकामे आहे किंवा खूप भूक लागली म्हणून एकदम जास्त खाणे पोटासाठी त्रासदायक ठरु शकते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी तर आहाराबाबत काळजी घ्यायलाच हवी. पण उपवासाच्या दुसऱ्या दिवशीही सकाळचा नाश्ता करताना काळजी घ्यायला हवी.
१. उपवासाच्या दिवशी आपण आहारात भगर, राजगिरा यांसारख्या गोष्टींचा आवर्जून समावेश करु शकतो. तसेच फळे, खजूर, सुकामेवा, दही, दूध, ताक यांसारख्या पोटाला आराम देणाऱ्या गोष्टींचा आहारात समावेश करायला हवा.
२. उपवासाच्या दिवशी दिवसा आपण वेगवेगळे पदार्थ खातो ते ठिक आहे. पण रात्रीच्या वेळी शक्यतो हलका आहार घेणे केव्हाही चांगले. त्यामुळे रात्री झोपताना जळजळ, मळमळ होत नाही.
३. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी शक्यतो चहा टाळलेला चांगला. त्याऐवजी तुम्ही गार दूध किंवा एखादे फळ, सुकामेवा अशा गोष्टी नक्की खाऊ शकता. कारण उपवासाच्या पदार्थांनी आपले म्हणावे तसे पोट भरत नाही आणि त्यात चहा घेतल्यास पित्त होण्याची शक्यता असते.
४. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ता करताना वातूळ किंवा पित्त होईल असे पदार्थ अजिबात खाऊ नका. शक्यतो हलके पदार्थ खाल्ल्याने पोटाला एकदम ताण पडणार नाही. यामध्ये आपण रव्याचा उपमा किंवा शिरा, तांदळाची उकड, भाज्यांचे सूप, मऊ भात, ज्वारीची गरम भाकरी, दलियाचा उपमा अशा गोष्टी खाऊ शकतो.
५. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी लगेचच जळजळीत मिसळ, वडा सांबार, तिखट ग्रेव्हीची भाजी अशा गोष्टी खाणे टाळावे. तसेच वडे, भजी असे तेलकट पदार्थही उपवासाच्या दुसऱ्या दिवशी खाणे टाळावे. या ऐवजी ताजी फळे, ताक, दही, लिंबू सरबत अशा गोष्टींचा आहारात आवर्जून समावेश करावा.