बाजारातून आपण मस्त ताज्या काकड्या सारख्या विकत आणतोच. काकडी उन्हाळ्यात तर खावी. काकडी थंड असते. त्यामुळे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी काकडी खाल्ली जाते. (Fasting Recipe : Cucumber Curry )काकडीची आपण कोशिंबीर करून खातो. काकडीचे इतर पदार्थ सहसा घरोघरी केले जात नाहीत. खिचडी बरोबर नुसती काकडी आपण खातो. काही घरांमध्ये खमंग काकडी हा पदार्थ तयार केला जातो. चवीला तर तो मस्तच लागतो. तसेच काकडीची घावने तयार केली जातात. ती ही अगदी मस्त लागतात. (Fasting Recipe : Cucumber Curry ) पण तुम्ही कधी काकडीची भाजी खाल्ली आहे का?
काकडीची भाजी चवीला मस्त लागतेच. दिसायला दुधीच्या भाजी सारखीच दिसते. तयार करायला तर अगदीच सोपी आहे. उपासासाठी तर उत्तमच. कधी तरी काय भाजी करायची असा प्रश्न पडतो. मग आयअॅम भाग्यश्री या चॅनलवरील काकडीची भाजी तयार करून बघा. नक्की आवडेल. आता लागोपाठ एक-एक सण आहेत. उपासासाठी एकदा नक्कीच तयार करून बघा.
साहित्य
काकडी, हिरवी मिरची, जीरं, तूप, दाण्याचं कुट, ओलं खोबरं, कोथिंबीर
कृती
१. काकडी सोलून घ्यायची. आणि मग तिचे तुकडे करून घ्यायचे. जास्त लहान तुकडे करू नका. भाजीसाठी इतर भाज्या जशा चिरता तशीच काकडी चिरा.
२. एका कढईमध्ये तूप घाला. थोडं गरम झालं की त्यामध्ये जीरं घाला. जीरं मस्त तडतडू द्या. जीरं तडतडल्यावर त्यात हिरव्या मिरचीचे लहान तुकडे घाला.
३. त्यामध्ये चिरलेल्या काकडीचे तुकडे घाला. व्यवस्थित ढवळून घ्या. मग झाकून वाफ काढा.
४. १५ मिनिटांमध्ये काकडी व्यवस्थित शिजेल. मग त्यामध्ये थोडंसं पाणी घाला. मग त्यात मीठ घाला. चवीसाठी अगदी थोडी साखरही वापरा.
५. मग वरतून दाण्याचं कुट घाला. ओलं खोबरंसुद्धा घाला. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. आणी ते सगळं ५ मिनिटे शिजू द्या.
ही भाजी नुसतीच खायला सुद्धा छान लागते. पटकन काही तयार करायचं असेल तर ही रेसिपी अगदीच योग्य आहे.