Join us  

१ वाटी तांदळाचा करा हॉटेलस्टाईल चमचमीत तवा पुलाव, घ्या परफेक्ट सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2024 5:12 PM

Easy Tawa Pulao Recipe :घरात सहज उपलब्ध असणारे जिन्नस वापरुन तयार होणाऱ्या तवा पुलावची सोपी रेसिपी...

भात ही आपल्या सगळ्यांचीच आवडीची गोष्ट. जेवणात भात असेल की जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटते. इतकेच नाही तर अनेक जण केवळ भातावरच जेवण करतात. दुपारच्या डब्यात आपण आवर्जून पोळी-भाजी नेतो पण रात्री मात्र आपण गरम वरण-भात लावतोच. सारखा वरण भात खायचा कंटाळा आली की आपण मूगाची खिचडी, पुलाव, मसालेभात असे काही ना काही वेगळे करतो. पण कधीतरी आपल्याला हॉटेलस्टाईल चमचमीत खाण्याची इच्छा होते (Easy Tawa Pulao Recipe).

अशावेळी आपल्या घरात थोड्या भाज्याही उपलब्ध असतील तर आपण घरच्या घरी हॉटेलसारखा परफेक्ट तवापुलाव करु शकतो. अगदी वाटीभर तांदळात होणारा चविष्ट असा हा तवा पुलाव सगळेच आवडीने खातात. एखादी कोशिंबीर किंवा सॅलेड यांच्यासोबत हा तवा पुलाव अतिशय छान लागतो. घरात सहज उपलब्ध असणारे जिन्नस वापरुन तयार होणारा हा चमचमीत असा तवा पुलाव कसा करायचा पाहूया ... 

१. गरम पाण्यात मीठ आणि हळद घालून त्यात बासमती तांदूळ चांगला मोकळा शिजवून घ्यायचा. 

(Image : Google)

२. मिक्सरमध्ये लसणाच्या ४ ते ५ पाकळ्या, २ ते ३ लाल मिरच्या आणि पाणी घालून याची लाल चटणी तयार करुन घ्यायची.

३. पॅनमध्ये बटर आणि तेल घालून त्यामध्ये जीरे, आलं-मिरचीची पेस्ट, कांदा घालून ते सगळे चांगले परतून घ्यायचे. 

४. यात बारीक चिरलेला बटाटा, फ्लॉवर, मटार, गाजर आणि थोडे मीठ घालून झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची. 

५. ही भाजी एका बाजूला करुन याच पॅनमध्ये पुन्हा बटर घालून त्यात लाल मिरचीची पेस्ट घालायची.

६. त्यावर पावभाजी मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सगळे चांगले एकजीव करुन घ्यायचे. 

७. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली शिमला मिरची घालून २ मिनीटे पुन्हा शिजवून घ्यायचे.

८. यात शिजवलेला भात आणि थोडं मीठ घालून हे सगळं पुन्हा चांगले परतून घ्यायचे. 

९. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हा गरमागरम तवा पुलाव खायला घ्यायचा.

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.