Join us  

दुपारचीच पोळीभाजी रात्री नको, मग टेस्टी फ्रँकी करा!टेस्ट बेस्ट आणि स्वयंपाकाला आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 4:54 PM

दुपारचीच पोळी भाजी रात्री खायचा कंटाळा आला, तर हा घ्या हटके पर्याय, अन्नही वाया जाणार नाही आणि मुलंही खूश

ठळक मुद्देरात्रीच्या वेळी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर हेल्दी आणि टेस्टी फ्रँकी नक्की ट्राय करुन बघादुपारची उरलेली पोळीभाजी खायचा कंटाळा येतो, तेव्हा हा पर्याय ठरेल उत्तम

दुपारची पोळी-भाजी उरली की पुन्हा रात्रीच्या जेवणाला वेगळे काय करायचे असा प्रश्न प्रत्येकीला पडतो. दुपारी डब्यासाठी केलेली कोरडी भाजी तर परत कोणीच खाणार नसते. मग आपणच एकटे किती खाणार...ही उरलेली पोळी भाजी तर संपवायचीये पण हे दुपारचेच आहे हे समजूही द्यायचे नाहीये असे करताना महिलांची तारेवरची कसरत असते. मुलांना आणि अगदी मोठ्यांनाही सतत वेगळे. चटपटीत काहीतरी हवे असते. मग बाहेरचे खाण्याचा पर्याय असतोच. यातही पिझ्झा, बर्गर, फ्रँकी असे चटपटीत पदार्थ सगळ्यांनाच आवडतात. पण घरच्या घरी तुम्ही अगदी कोणालाच समजणार नाहीत अशी फ्रँकी केलीत तर? तिही राहीलेल्या पोळी-भाजीपासून आणि कोणालाच समाजणार नाही अशी...चला तर मग पाहूयात घरच्या घरी फ्रँकी करण्याचा सोपा पर्याय...

१. दुपारी तुम्ही कोबी, तोंडली, बटाटा, फ्लॉवर, मूळा, भोपळा अशी एखादी भाजी डब्यासाठी केली असेल आणि रात्री ती भाजी उरली तर तिचा तुम्ही फ्रँकीसाठी अतिशय चांगला उपयोग करु शकता. 

२. पोळीवर ही भाजी सरळ रेषेत घालायची. एकाहून जास्त भाज्या असतील तरीही त्या एकत्र करुन तुम्ही चमचाभर भाजी एका पोळीवर घालू शकता.

(Image : Google)

३. एका कढईत कांदा तेलात फ्राय करुन घ्यायचा. हा कांदा छान क्रिस्पी झाला की तोही या भाजीवर घालायचा.

४. तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटोचे उभे काप, किसलेले बीट, गाजर असा सलाडमधील एखादा पर्यायही तुम्ही यावर घालू शकता. 

५. घरात असेल तर फ्रोजन मटार, कॉर्न, पनीरचे तुकडे, किसलेले चीज याचाही वापर या फ्रँकीमध्ये तुम्ही करु शकता.  

६. यावर सगळे घालून झाले की त्यावर टोमॅटो केचअप घालायचे. आवडीनुसार तुम्ही इतर स़ॉसही घालू शकता. 

७. तुम्हाला आवडत असेल आणि घरात उपलब्ध असेल तर मिक्स्ड हर्बस, ओरिगॅनो, मिरपूड यांपैकी काही घातल्यास फ्रँकीला बाहेरच्यासारखी वेगळी चव येते.  

(Image : Google)

८. सगळे घालून झाले की पोळी रोल करायची आणि तव्यावर दोन्ही बाजूने हा रोल तेलावर किंवा बटरवर खरपूस भाजून घ्यायचा. 

९. मध्यभागी कट करुन हा रोल खायला दिल्यास तो पोटभरीचाही होतो आणि चटपटीतही होतो. तसेच तुम्ही राहीलेल्या पदार्थांचे काही केले आहे हेही खाणाऱ्यांना समजत नाही. 

१०. तेव्हा घरातील मंडळींनी हेल्दी खावे आणि तंदुरुस्त राहावे असे तुम्हाला वाटत असेल तर अशा सोप्या युक्त्या जरुर वापरायला हव्यात.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.हेल्थ टिप्स