आपल्या स्वयंपाकघरात रोज तयार होणाऱ्या भाज्यांच्या साली आपण बहुतांश वेळा फेकून देतो, पण या सालींमध्येही पौष्टिक घटक आणि स्वाद दडलेला असतो. आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असलेल्या भाज्यांमध्ये दोडक्याचा समावेश होतो. दोडक्याची भाजी चवीला चांगली लागते, पण जेव्हा आपण दोडका चिरतो, तेव्हा त्याची जाडसर साल सरळ कचऱ्याच्या डब्यांत फेकून देतो. दोडक्याची भाजी जेवढी पौष्टिक असते, त्याहून अधिक जीवनसत्त्वे आणि फायबर त्याच्या सालीं मध्ये दडलेले असते(Dodkyachya Salichi Chatni Recipe).
या 'टाकाऊ' समजल्या जाणाऱ्या सालीपासून आपण एक चमचमीत, चटपटीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे १५ दिवस सहज टिकणारी सुकी चटणी तयार करु शकता. ही सुकी चटणी चवीला चमचमीत, झणझणीत तर असतेच सोबतच आरोग्यासाठीही तितकीच पौष्टिक असते. ही दोडक्याच्या सालीची चटणी जेवणाची चव वाढवते आणि शरीराला भरपूर प्रमाणात पोषक तत्व देते. ही रेसिपी करायला खूप सोपी आहे आणि एकदा तयार केल्यावर तुम्हाला पुन्हा पुन्हा ती करण्याचा मोह आवरणार नाही. दोडक्याच्या सालीची पौष्टिक अशी सुकी चटणी तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. दोडक्याच्या साली - १ कप
२. सुकं खोबरं - १ कप
३. पांढरे तीळ - २ टेबलस्पून
४. तेल - ३ ते ४ टेबलस्पून
५. लसूण पाकळ्या - १५ ते २० (बारीक चिरुन घेतलेल्या)
६. जिरे - १ टेबलस्पून
७. कांदा - १ कप
८. हळद - १/२ टेबलस्पून
९. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून
१०. धणेपूड - १/२ टेबलस्पून
११. गरम मसाला - १/२ टेबलस्पून
१२. मीठ - चवीनुसार
घरीच करा पारंपरिक चवीचा हैद्राबादी दालचा! रेस्टॉरंटसारखा होईल परफेक्ट - चव भारी सुगंध दरवळेल घरभर...
उडपी 'अण्णा' स्टाईल पांढरीशुभ्र चटणी! परफेक्ट चवीसाठी ७ टिप्स - डोसा, वडा, इडली खा मनसोक्त...
कृती :-
१. सगळ्यात आधी दोडकी पाण्याने स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घ्यावीत. मग ही दोडक्याची सालं सुरीने बारीक चिरुन मिक्सरच्या भांड्यात घालून थोडी जाडसर भरड होईल अशी वाटून घ्यावीत.
२. मग एका पॅनमध्ये, हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं मिश्रण घालून संपूर्णपणे कोरडं होईपर्यंत हलकेच परतवून घ्यावे. त्यानंतर पॅनमध्ये पांढरे तीळ व सुक खोबरं देखील २ ते ४ मिनिटे परतवून कोरडे भाजून घ्यावे.
३. मग याच पॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यात बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, जिरे, बारीक चिरलेला कांदा घालून तेलात खरपूस रंग येईपर्यंत हलकेच भाजून घ्यावा.
४. त्यानंतर या मिश्रणात हळद, लाल मिरची पावडर, धणेपूड, गरम मसाला, चवीनुसार मीठ घालावे. मग सगळे मिश्रण कालवून एकजीव करून घ्यावे.
५. सगळ्यात शेवटी यात दोडक्याच्या परतवून घेतलेल्या साली, पांढरे भाजून घेतलेले तीळ व भाजलेलं सुकं खोबरं घालून सगळे जिन्नस व्यवस्थित कालवून घ्यावे.
दोडक्याच्या हिरव्यागार सालीची १५ दिवस टिकणारी अशी पौष्टीक सुकी चमचमीत चटणी खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम वरण - भात, चपाती किंवा भाकरीसोबत देखील ही चटणी खाण्यासाठी चविष्ट लागते.
