Cheese Tea : भारतामध्ये चहाचे शौकीन लाखो लोक आहेत. इतकंच नव्हे तर आता लोक वेगवेगळ्या प्रकारे चहा बनवू लागले आहेत. सामान्यपणे दुधाचा किंवा काळा चहा साखर टाकून प्यायला जातो. पण काही प्रकार असे आहेत जे या पारंपरिक चवीपासून पूर्ण वेगळे असतात. जसे की कोल्ड टी किंवा खारी चहा. असाच एक चहाचा वेगळा प्रकार म्हणजे 'पनीर चहा'. तो कसा असतो, कसा करायचा हे आज आपण पाहणार आहोत. खासकरून दिवाळीत (Diwali 2025) आपण हा वेगळा चहा घरी येणाऱ्या पाहुण्यांना देऊ शकता.
पनीर चहाची सुरूवात कशी झाली?
पनीर चहाची सुरुवात सुमारे २०१० च्या आसपास तैवानमध्ये झाली. त्यानंतर चीनमधील काही शहरांमध्ये या चहाची एंट्री झाली आणि तिथे तो प्रीमियम चहा म्हणून प्रसिद्ध झाला.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चहात मुळात पनीर नसतंच. काही ठिकाणी याला 'पनीर चहा' असं म्हटलं जातं, तर जास्तीत जास्त ठिकाणी तो 'चीज टी' या नावाने ओळखला जातो.
चीज टी म्हणजे काय?
चीज टी मुख्यपणे थंड स्वरूपात दिला जातो. कधी कधी त्यात बर्फाचे तुकडे टाकले जातात आणि वरती हलकी, फेसाळ चीजची लेयर असते. जी या चहाला प्रीमियम टच देते.
कसा बनवायचा चीज टी?
सगळ्यात आधी १ कप ब्लॅक टी किंवा ग्रीन टी तयार करून थंड होऊ द्या. जास्त थंड हवी असल्यास त्यात काही आइसक्यूब्स घालू शकता. चीज फोम तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये २ मोठे चमचे क्रीम चीज, २ मोठे चमचे दूध किंवा साय, १ मोठा चमचा साखर आणि एक चिमूट मीठ घाला. चमच्याने किंवा हँड व्हिस्कने फेटा, जोपर्यंत मिश्रण हलकं, क्रीमी आणि फेसाळ होत नाही.
जर क्रीम चीज उपलब्ध नसेल, तर अमूल क्रीम आणि थोडी साय मिसळू शकता. गोडपणा किंवा मिठाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करा. आता एका ग्लासमध्ये थंड चहा ओता आणि त्यावर तयार चीज फोम घाला. हवं असल्यास वर थोडा कोको पावडर किंवा कॉफी पावडर शिंपडा.