-शुभा प्रभू साटम (खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक)
आचरट नमुना बघायचा तर दिवाळीच्या सुमारास फुरफुरणाऱ्या अनेक गोष्टी पाहा. सोशल मीडियातील पोस्ट पाहा.
काय तर म्हणे बेक्ड करंज्या, बेक्ड शंकरपाळी, नो ऑइल चिवडा, बेक्ड चकल्या अशा नावाने येणाऱ्या पदार्थांची चर्चा सुरू होते. अरे कशाला? वर्षातून एकदा येणारी दिवाळी! आणि त्या दिवाळीतून खमंग तळलेला फराळ वजा केला तर हाती काय उरेल?
बिनसाखरेची मिठाई म्हणून जो भंपक प्रकार मिळतो तो पण यातलाच. मिठाई, मिष्ठान्न... या नावातच काय जादू आहे लोक हो...
पुरणपोळीतून गूळ वगळला तर काय खायचं? फक्त शिजवलेली चणाडाळ?
आणि या मंडळींची वक्रदृष्टी कायम आमच्या चकल्या करंज्या यावरच का?
साजूक तुपात हलक्या गुलबट रंगावर तळलेली करंजी, त्यातही कानोला असेल तर बहारच! तशी सुंदर करंजी खाणं, हा काय अलौकिक अनुभव आहे सांगू...
तेच चकलीचंही! अधूनमधून तिळाचे दाणे लेवून आलेली चकली तोंडात गेल्यावर स्वादाची जी कारंजी जिभेवर उडतात ती शब्दात सांगणे अशक्य!
कुरकुरीत चिवडा खाताना मधून लागणारी मिरची, किंचित खारट काजू, खमंग शेंगदाणा, खोबरे कातल्या आणि या सर्वांचा एकमेळ, रूप रंग गंध चवीची ही सृष्टी... असा हा चिवडा!
आणि काय तर म्हणे बिनतेलाचा चिवडा?
कशाला तो? मान्य आहे की खूप तेल, तूप योग्य नाही, आहारावर नियंत्रण हवे, जीवनशैली नीट हवी इत्यादी.
अरे पण इतरवेळी ब्रेड, पाव, बिस्कीट, वडे, समोसे झालेच तर पिझ्झा, बर्गर, मॅगी गिळता, जंकवर ताव मारता तेव्हा कुठं जातं हे सारं?
येऊन जाऊन पारंपरिक तळण नको तळण वाईट!
मध्येच काय तर पाण्यात तळून पुरी खा. कशाला? नका खाऊ त्यापेक्षा.
एअर फ्रायरमध्ये केलेले समोसे खाल्लेत कधी? कोपऱ्यावरच्या भैयाच्या भेळेची आण आहे तुम्हाला... सांगा कशी असते चव?
ब्राऊन रंगाचा पुठ्ठा पण चवदार लागेल असा लागतो तो भाजलेला समोसा. भाजलेली करंजी, म्हणजे बेक्ड करंजी... डोळे मिटून खाल्ले तर फक्त सारण चव कळेल. चिरोटा तळून न खाता भाजून खाल्ला तर काय मोठे साध्य होणारे?
त्यापेक्षा दिवाळी आहे, मस्त गरम तेलातून निघालेली, तेलाचे बुडबुडे सोडणारी चकली खा!
कसली जीवघेणी चव असते, भाजलेली चकली खाताना तिखट पीठ खातोय असं वाटतं.
आता सांगा, काजू कतली हा स्वर्गीय प्रकार साखरेशिवाय कसा खाणार? मोतीचूर लाडूमध्ये साखर नाही तर काय चणाडाळ गिळणार?
शंकरपाळी तळून नायतर काय उन्हात सुकवून खायची का?
मोहनथाल, मायसोरपा त्यांचं काय?
मुख्य म्हणजे का?
दिवाळीत असं मुद्दाम कॅलरी कॅलरी करून बेचव खाण्यात काय मजा? आणि मुख्य म्हणजे का?
गंमत अशी की, हे सर्व बोंबलून सांगणारी मंडळी खासगीत काय गिळतात हे गुलदस्त्यात असते.
आमच्या घरात - मनात मात्र क्लेश.
आजकाल दिवाळी पूर्वीसारखी नवलाईची राहिली नाहीये. कोपऱ्याकोपऱ्यावर चकली चिवडा नेहमी मिळतो. पण, दिवाळीला पारंपरिक फराळ न करता असले बेक्ड करंजी, चकली असले खाद्यधर्म बुडवेप्रकार करणाऱ्या मंडळींना रौरव नरक मिळेल!
बरं तुम्हाला खायचं तर खा, पण हे लोकं स्वतः गिळून गप बसतील तर नाही! ते इतरांना उपदेश करणार!
पण, खरं सांगते, कोण्या सुगरण कायस्थ सुगरणीने केलेल्या, सुरेख पदर सुटलेल्या कानोल्याचा अलगद घास घेत असताना अय्या, डीप फ्राय खाता तुम्ही असे कोणी विचारले ना की चकलीच्या उकळत्या तेलात त्याला / तिला तळून काढावे, असे मला वाटते.
असे कोण शंभर करंज्या, सतराशे साठ चकल्या, पोते भर चिवडा खाणारे? दिवाळी आहे राव... मौका है दस्तूर भी...
शुगर फ्री, ऑइल फ्री, ग्लुटेन फ्री, शुगर फ्री, कार्ब फ्री, थोडक्यात टेस्ट फ्री आचरट प्रकार नको!
दोन करंज्या, एक लाडू, चार चकल्या खाईन पण तुपात, तेलात तळलेल्या, साखरेत घोळलेल्याच खाईन.
आनंद देऊ, आनंदात राहू... दिवाळीच्या दणकून शुभेच्छा!
आनंदानं खा!
आपले सर्व सण शेतप्रधान आहेत. दिवाळी येते तेव्हा शेत पिकत आलेली असतात. तुलनेत शेतीची कामे कमी होतात. वातावरण गार होत असते. हिवाळ्याची चाहुल लागते. अशा वेळी स्निग्ध पदार्थ केले जातात. पूर्वी नाक्यानाक्यावर फराळ मिळत नसे. लोकांना छान चांगले चांगले खायला मिळावे, यासाठी दिवाळी आली. अंधार लवकर पडू लागतो. त्यासाठी पणत्या रोषणाई कंदील फटाके आले. माणसांनी एकमेकांना भेटणं, सुखदु:खात सोबत राहून आनंद साजरा करणं आलं.
मुद्दा काय, की ऋतूनुसार आहार हे पूर्वज मानायचे. वागायचे. थोडे खायचे. पण, दर्जेदार खायचे. तूप, साखर तळण असणारे पदार्थ मनोवृत्ती उल्हसित करतात.
आजच्या भाषेत मूड एलेव्हेटर.
आता रोज दिवाळी असते आपल्याला. पण, असे पारंपरिक पदार्थ पारंपरिक रीतीने करून खाल्ले तर काय जगबुडी येणारे?
थोडं खा, तब्येत जपा, आनंदानं खा!
https://www.instagram.com/masalamaharani/
shubhaprabhusatam@gmail.com