Dhaba Style Chhole Recipe : घरातील लोक तर लोक नेहमीच खातात, पण वेगळं काहीतरी खायचं म्हणून बरेच बाहेर हॉटेल किंवा ढाब्यावर जाऊन जेवण करतात. हॉटेलपेक्षा बऱ्याच लोकांना ढाब्यावरील जेवण अधिक आवडतं. खासकरून ढाब्यांवरील भाज्या लोकांच्या खास आवडीच्या असतात. ढाब्यावर मिळणारे मसालेदार, चटपटीत छोले खायलाच भारी लागतात. आता तेच ढाबा-स्टाईल छोले तुम्ही घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने बनवू शकता.
साहित्य
काबुली चणे – 1 कप (रात्रभर भिजवलेले)
तेजपत्ता – 2
मोठे वेलदोडे – 1
दालचिनी – 1 छोटा तुकडा
चहा पत्ती – 1 चमचा
मीठ – चवीनुसार
बेकिंग सोडा – 1/4 चमचा
तेल किंवा तूप – 5-6 चमचे
जिरे – 1 छोटा चमचा
हिंग – 1 चिमूट
कांदा पेस्ट – 1 मध्यम
आलं-लसूण पेस्ट – 1 चमचा
हिरव्या मिरच्या – 2-3
टोमॅटो प्यूरी – 2 मध्यम टोमॅटो
हळद – 1/2 चमचा
धने पावडर – 2 छोटे चमचे
तिखट – 1 चमचा
छोले मसाला – 2 चमचे
आमचूर पावडर – 1/2 चमचा
गरम मसाला – 1/2 चमचा
कसूरी मेथी – 1 चमचा
आल्याचे तुकडे – थोडे
हिरवी मिरची – 1-2
काश्मीरी लाल तिखट – 1/2 चमचा
कृती
चणे शिजवणे
रात्रभर भिजवलेले चणे धुवून प्रेशर कुकरमध्ये टाका. त्यात मीठ, बेकिंग सोडा, तेजपत्ता, मोठा वेलदोडा, दालचिनी आणि चहा पत्तीची पोटली घाला. 1 शिटी झाल्यावर गॅस मंद करा आणि अजून 5-6 शिट्या होऊ द्या. चणे मऊ शिजल्यानंतर चहा पत्तीची पोटली आणि खडे मसाले काढून टाका.
मसाला तयार करणे
कढईत तेल किंवा तूप गरम करा. जिरे आणि हिंग टाका. कांद्याची पेस्ट सोनेरी होईपर्यंत परता. आलं-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून 1 मिनिट परता. मग टोमॅटो प्यूरी आणि थोडे मीठ घालून तेल सुटेपर्यंत परता. आता हळद, धने पावडर, तिखट, छोले मसाला आणि आमचूर घालून 2-3 मिनिट परता.
छोले मिसळणे
शिजलेले चणे या मसाल्यात घाला. घट्टपणा यावा म्हणून थोडे चणे हलकेच मॅश करा. कसूरी मेथी बारीक करून टाका आणि गरम मसाला घाला. झाकण ठेवून 10-15 मिनिट मंद आचेवर शिजू द्या, म्हणजे मसाला चण्यामध्ये छान मुरेल.
शेवटचा तडका
एका छोट्या पॅनमध्ये तूप गरम करा. त्यात आल्याचे तुकडे आणि हिरवी मिरची हलकी परतवून घ्या. गॅस बंद करून त्यात काश्मीरी लाल तिखट घाला. हा तडका गरमागरम चण्यांवर ओतून हिरवी कोथिंबीर घालून सजवा.
