नाश्त्याला काहीतरी पौष्टिक असावं पण ते चवीलाही तितकंच चविष्ट असावं, असं आपल्याला नेहमीच वाटतं. दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये 'डोसा' सर्वांचाच आवडता पदार्थ आहे, पण जर आपल्याला हेल्दी म्हणून डाळ तांदूळाचा डोसा खाणे टाळायचे असेल किंवा काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल, तर 'दलिया डोसा' हा नाश्त्यासाठी उत्तम पदार्थ आहे. दलिया म्हणजेच गव्हाच्या लापशीपासून तयार केलेला डोसा कुरकुरीत तर होतोच, शिवाय तो पचायलाही हलका असतो(How To Make Daliya Dosa At Home).
दलिया (लापशी) हा पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो, पण रोज तेच ते दलियाचे गोड किंवा तिखट पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर 'दलिया डोसा' हा एक उत्तम आणि चविष्ट पर्याय आहे. गव्हाच्या दलियामध्ये भरपूर फायबर आणि प्रोटीन्स असतात, जे वजन कमी करण्यासाठी मदत करतात. तांदळाच्या डोशाला एक हेल्दी ट्विस्ट देऊन आपण त्यापासून पौष्टिक डोसा बनवू शकतो. जे लोक रक्तातील साखर नियंत्रित ठेवू इच्छितात किंवा वेटलॉस करायचे असल्यास, त्यांच्यासाठी हा दलिया डोसा उत्तम ब्रेकफास्ट ठरू शकतो. नाश्ता, टिफिन किंवा रात्रीच्या हलक्या जेवणासाठी योग्य असलेला दलिया डोसा घरी कसा तयार करायचा, त्याची ही सोपी आणि (Daliya Dosa Recipe) झटपट रेसिपी पाहूयात(How To Make Healthy And Tasty Broken Wheat Dosa/Daliya Dosa).
साहित्य :-
१. दलिया - १ कप
२. पिवळी मूग डाळ - १/२ कप
३. उडीद डाळ - १/२ कप
४. मेथी दाणे - १ टेबलस्पून
५. पोहे - १/२ कप
६. पाणी - गरजेनुसार
७. मीठ - चवीनुसार
८. तेल - २ ते ३ टेबलस्पून
९. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
१०. लाल तिखट मिरची पावडर - चिमूटभर
११. साजूक तूप - १ ते २ टेबलस्पून
कृती :-
१. एका मोठ्या बाऊलमध्ये दलिया घेऊन त्यात पिवळी मूग डाळ, उडीद डाळ, मेथी दाणे घालून सगळे जिन्नस एकत्रित करून घ्यावे. पाण्याने ३ ते ४ वेळा हे सगळे मिश्रण स्वच्छ धुवून घ्यावे.
२. या स्वच्छ धुवून घेतलेल्या मिश्रणात पुरेसे पाणी घालून ते झाकून २ ते ३ तासांसाठी पाण्यांत भिजत ठेवावे.
३. त्यानंतर मिश्रणातील पाणी काढून ते मिश्रण एका मोठ्या मिक्सर जारमध्ये ओतून घ्यावे. याच मिश्रणासोबत त्यात पातळ पोहे आणि थोडे पाणी घालून मिश्रण मिक्सरमध्ये एकत्रित वाटून घ्यावे.
४. मिक्सर जारमधील तयार बॅटर एका भांड्यात काढून ते व्यवस्थित चमच्याने कालवून घ्यावे. बॅटर झाकून ६ ते ७ तासांसाठी फुलून येण्यासाठी तसेच ठेवून द्यावे.
५. बॅटर व्यवस्थित फुलून आल्यानंतर त्यात चवीनुसार थोडे मीठ घालावे.
६. पॅनला थोडेसे तेल लावून त्यावर तयार बॅटर घालून खरपूस असे डोसे भाजून घ्यावेत. डोसा भाजत असतानाच आपण त्यावर आपल्या आवडीप्रमाणे साजूक तूप लावून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लाल तिखट मसाला देखील भुरभुरवून घालू शकता.
ना डाळ - तांदूळ, दलिया वापरुन तयार केलेले खरपूस असे चविष्ट डोसे खाण्यासाठी तयार आहेत. चटणी किंवा सॉससोबत हे डोसे खायला अधिकच चविष्ट लागतात. दलियाच्या याच बॅटर पासून आपण डोशाप्रमाणेच, उत्तप्पा, आप्पे, ढोकळा, इडली देखील तयार करु शकतो.
