Join us  

दत्तजयंती स्पेशल : दत्त मंदिरात करतात तशी दलिया खीर घरी ट्राय करा, घ्या सोपी पारंपरिक रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2023 10:47 AM

Datta jayanti Special Dalia Kheer Recipe : थंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा देणारी ही दलियाची खीर अतिशय पौष्टीक आणि करायला सोपी असते.

दत्तजयंती म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात येणारा एक महत्त्वाचा उत्सव. गुरुचरीत्राचे अखंड पारायण करुन दत्तजयंतीला हे पारणे फेडले जाते. राज्यभरात हा उत्सव पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दत्त मंदिरात या दिवशी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आवर्जून प्रसादाचे आयोजन केलेले असते. ७ दिवसांचा उपवास सोडण्यासाठी आणि दत्ताला नैवेद्य म्हणून दलियाची खीर हा पदार्थ केला जातो. थंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा देणारी ही दलियाची खीर अतिशय पौष्टीक आणि करायला सोपी असते. दत्त मंदिरात असते तशी दलियाची खीर घरी करायची असेल तर ती कशी करायची याची सोपी रेसिपी पाहूया (Datta jayanti Special Dalia Kheer Recipe)... 

साहित्य - 

१. गव्हाचा दलिया - २ वाट्या

२. दूध - अर्धा लिटर 

(Image : Google)

३. गूळ किंवा साखर - १ ते १.५ वाटी

४. तूप - अर्धी वाटी

५. सुकामेवा - पाव वाटी 

६. वेलची पूड - अर्धा चमचा

७. ओल्या खोबऱ्याचा किस - १ वाटी 

कृती -

१. गव्हाचा दलिया स्वच्छ धुवून पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्यावा.

२. कढईमध्ये तूप घालून त्यामध्ये हा दलिया घालून चांगला परतून घ्यावा.

३. यामध्ये गूळ किंवा साखर आणि खोबऱ्याचा किस घालून हे मिश्रण एकजीव करावे. 

४. थोडी वाफ आल्यानंतर त्यामध्ये दूध घालून झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी.

५. मग यामध्ये सुकामेव्याचे काप आणि वेलची पावडर घालून सगळे पुन्हा एकदा चांगले हलवून एकजीव करावे. 

६. ही खीर घट्ट किंवा पातळ कशीही छान लागत असल्याने दूध आवडीनुसार घालावे.

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.दत्त मंदिर