राजस्थानी जेवणाची खरी लज्जत वाढते ती ताटाच्या कोपऱ्यात वाढलेल्या झणझणीत, चविष्ट, चमचमीत दही मिरचीमुळेच... जेव्हा घरात कोणतीही भाजी उपलब्ध नसते किंवा रोजच्या जेवणात काहीतरी चटपटीत आणि चविष्ट खाण्याची इच्छा होते, तेव्हा राजस्थानी स्टाईल 'दही मिरची' हा एक उत्तम पर्याय ठरतो. ही रेसिपी दिसायला जितकी सुंदर आहे, चवीला तितकीच अप्रतिम लागते. तिखट मिरच्या आणि दह्याचा आंबटपणा यांचे मिश्रण जिभेला एक वेगळीच चव देऊन जाते. विशेष म्हणजे, ही राजस्थानी स्टाईलची दही मिरची तयार करण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आणि घरातील मोजक्या साहित्यात ती झटपट तयार होते. ज्यांना मसालेदार आणि चटपटीत पदार्थ खायला आवडतात, त्यांच्यासाठी 'दही मिरची' म्हणजे अस्सल राजस्थानी मेजवानीच...(dahi mirchi ki sabzi rajasthani style).
काहीवेळा भाजीला काय करावे हा मोठा प्रश्न पडतो, किंवा रोजची तीच तीच भाजी खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तोंडी लावायला काहीतरी चमचमीत हवे असते. राजस्थानी जेवणाची खासियत असलेली 'दही मिरची' ही अशीच एक खास रेसिपी आहे, जी साध्या वरण-भाताची किंवा पोळीची चव देखील वाढवते. कमी वेळात, कमी साहित्यात आणि अत्यंत चविष्ट होणारी ही रेसिपी घरातील प्रत्येकाचीच आवडती...राजस्थानी स्टाईल पारंपरिक चवीचा अनुभव देणारी ही इन्स्टंट दही मिरची रोजच्या साध्या जेवणाचीही (rajasthani style curd chilli recipe) रंगत वाढवते. राजस्थानी स्टाईल दही मिरची तयार करण्याची (how to make dahi mirchi at home) साधीसोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. हिरव्या मिरच्या - १ कप
२. तेल - १ ते २ टेबलस्पून
३. मोहरी - १/२ टेबलस्पून
४. जिरे - १/२ टेबलस्पून
५. कलोंजी - १/२ टेबलस्पून
६. मीठ - चवीनुसार
७. लाल मिरची पावडर - १.५ टेबलस्पून
८. हळद - १/२ टेबलस्पून
९. धणेपूड - १/२ टेबलस्पून
१०. दही - १ कप
कृती :-
१. सगळ्यातआधी हिरव्या मिरचीचे देठ काढून मिरच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्याव्यात.
२. या हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित जाडसर भरड होईल अशा वाटून घ्याव्यात.
३. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी आणि बडीशेप घालून मस्त अशी खमंग फोडणी तयार करून घ्यावी.
टपरीवर मिळतो अगदी तसाच चहा करण्याची रेसिपी! दूध आणि पाण्याचे अचूक प्रमाण - चहा होईल परफेक्ट...
४. त्यानंतर या फोडणीत मिक्सरमध्ये वाटून घेतलेली हिरवी मिरची घालून २ मिनिटे हलकेच परतवून घ्यावी.
५. त्यानंतर यात चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर, हळद, धणेपूड, दही घालून सगळे मिश्रण कालवून एकजीव करून घ्यावे.
६. ३ ते ५ मिनिटे व्यवस्थित शिजवल्यानंतर ही चटणी खाण्यासाठी तयार आहे.
राजस्थानी स्टाईलची मस्त चमचमीत, झणझणीत दही मिरची गरमागरम भाकरी किंवा चपाती सोबत खाल्ल्यास कोणत्याही वेगळ्या भाजीची गरजच लागणार नाही इतकी अप्रतिम चव लागते.
