कढीपत्ता (Curry Leaves) हा फक्त फोडणीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी मानला जातो. कढीपत्त्याची चटणी चवीला तर उत्कृष्ट असतेच पण तब्येतीच्या दृष्टीनंही त्याचे बरेच फायदे आहेत. बरेचजण भाजीतला, वरणातील कढीपत्ता ताटाच्या बाजूला काढून ठेवतात. हाच कढीपत्ता तुम्ही चवदार चटणीच्या माध्यमातून ताटात वाढला तर जेवणाची चवही वाढेल. ही चटणी करण्याची पद्धत अत्यंत सोपी असून त्यात वापरले जाणारे घटक आपल्या स्वयंपाकघरातील सहज उपलब्ध होतात. कढीपत्ताही तुम्हाला सहज उपलब्ध होईल. फक्त तो ताजा असायला हवा. बरेच दिवस फ्रिजमध्ये ठेवून कोरडा झालेला कढीपत्ता चटणीसाठी वापरू नका. (How To Make Curry Leaves Chutney)
कढीपत्त्याची चटणी करण्यासाठी काय साहित्य लागते?
कढीपत्त्याची चटणी करण्यासाठी दोन वाट्या ताजी कढीपत्त्याची पानं, अर्धी वाटी सुकं खोबर, पाव वाटी शेंगदाणे, २ चमच डाळवं, ८ ते १० लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार लाल तिखट आणि थोडं जीरं लागेल. ही चटणी जास्त दिवस टिकावी यासाठी कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून, सुती कापडानं पूर्णपणे कोरडी करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे.
कढीपत्त्याची चटणी कशी करतात?
सगळ्यात आधी एक कढई गरम करून त्यात कढीपत्त्याची पानं कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या. पानं नीट भाजली गेली तरच चटणीला चांगली चव येते आणि ती जास्त दिवस टिकते.
त्यानंतर त्याच कढईत शेंगजाणे, खोबरं, लसूण पाकळ्या, डाळवं, जीरं, लाल तिखट आणि चवीनुसार मूठ एकत्र करून घ्या.हे मिश्रण मिक्सरला एकाचवेळी न फिरवता हळूहळू जाडसर वाटून घ्या. जास्त बारीक पीठ केल्यास चटणीची मूळ चव कमी होते. तयार झालेली ही खमंग चटी एका हवाबंद डब्यात भरून ठेवा.
ही चटणी तुम्ही गरम भाकरी, चपाती किंवा वरण-भातासोबत तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता. कढीपत्त्यात लोहाचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे ही चटणी केसांच्या आरोग्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. ज्या मुलांना पानात असलेला कढीपत्ता आवडत नाही त्यांच्यासाठी हा उत्तम पौष्टीक पर्याय आहे. या चटणीच्या सेवनानं केस गळण्याची समस्याही नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
