Spring dosa recipe : काहीतरी वेगळं खाण्याचा विचार केला तर जास्तीत जास्त लोकांच्या डोळ्यांसमोर एकतर डोसा असतो नाही तर मग काहीतरी चायनीज खायचा विचार येतो. पण जर भारतीय डोसा आणि चायनीज फ्लेवर एकाच डीशमध्ये मिळालं तर? अशाच एका खास डिशची रेसिपी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ती म्हणजे स्प्रिंग डोसा! पारंपरिक दक्षिण भारतीय डोश्याला देसी चायनीज टच देऊन तयार होणारी ही रेसिपी टेस्टी आणि सगळ्यांना आवडणारी अशी आहे. जर काही वेगळं खाण्याचं मन होत असेल तर ही डीश ट्राय करू शकता. महत्वाची बाब म्हणजे या एका रेसिपीतून तुम्ही दोन वेगळ्या इंडो-चायनीज डिशेस तयार करू शकता.
स्प्रिंग डोसा
चायनीज स्टफ्ड डोसा रोल्स
दोन्ही डिश लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. चला तर पाहू या रेसिपी.
स्प्रिंग डोसा रेसिपी
साहित्य:
डोसा पीठ (तांदूळ आणि उडीद डाळीचे)
बारीक चिरलेल्या भाज्या – गाजर, कोबी, ढोबळी मिरची, कांदा
हिरवे म्हणजे पालीचे कांदे
आलं-लसूण पेस्ट
सोया सॉस – 1 चमचा
रेड चिली सॉस – 1 चमचा
व्हिनेगर – ½ चमचा
मीठ आणि मिरी पूड – चवीनुसार
तेल
कसा बनवाल?
पॅनमध्ये थोडं तेल गरम करून त्यात आलं-लसूण पेस्ट घालून थोडं परतून घ्या. नंतर त्यात चिरलेल्या भाज्या घालून 2–3 मिनिटं जोराच्या आचेवर परता, म्हणजे त्या कुरकुरीत राहतील. आता त्यात सोया सॉस, रेड चिली सॉस, व्हिनेगर, मीठ आणि मिरी पूड घालून नीट मिसळा. दुसऱ्या नॉनस्टिक तव्यावर डोसा पसरवा, थोडं तेल लावा आणि डोसा हलका कुरकुरीत झाल्यावर त्यात हे चायनीज स्टफिंग ठेवा. डोसा फोल्ड करा आणि गरमागरम सर्व्ह करा.
चायनीज स्टफ्ड डोसा रोल्स
कसे बनवाल?
लहान आकाराचे आणि पातळ डोसे तयार करा. मध्ये तीच तयार केलेली चायनीज स्टफिंग ठेवा. डोसा हलक्या हाताने रोल करा. इच्छेनुसार टूथपिकने फिक्स करा किंवा छोटे तुकडे करा. टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा मेयोनेझसह सर्व्ह करा.
स्टफिंगमध्ये तुम्ही उकडलेले नूडल्स, पनीर किंवा टोफूही घालू शकता. डोसा जास्त कुरकुरीत हवा असल्यास तवा चांगला गरम करा. हे रोल्स मुलांच्या टिफिनसाठी किंवा पार्टी स्नॅकसाठी परफेक्ट आहेत.
या एका रेसिपीतून तुम्ही मुख्य जेवणासाठी एक डिश आणि स्नॅकसाठी दुसरी डिश तयार करू शकता. काहीतरी वेगळं आणि टेस्टी ट्राय करायचं असेल, तर आजच स्प्रिंग डोसा बनवा!
