Join us
Daily Top 2Weekly Top 5

नारळ फोडणे आणि खवणे होईल सोपे; शक्ती नको, युक्ती वापरा! वापरा या भन्नाट आयडीया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 13:27 IST

नारळ फोडणं जरा शक्तीचं काम. म्हणून या कामासाठी नेहमीच घरातल्या पुरूष माणसांना हाक मारावी लागते. आता ही सवय सोडा. कारण अशा काही युक्ती वापरल्या तर नारळातून खोबरं बाजूला काढणं आता सहज शक्य आहे.

ठळक मुद्देघरगुती यु ट्यूब चॅनलचा एक मस्त व्हिडियो सध्या व्हायरल झाला आहे. यामध्ये योगिता यांनी खोबऱ्यातून नारळ कसा वेगळा करायचा, याच्या काही सोप्या युक्ती सांगितल्या आहेत.

पुजा, सण- समारंभ, नारळाच्या वड्या करण्याचा घाट किंवा अन्य कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे घरात नेहमीच नारळ आणले जाते. हे नारळ जेव्हा फोडायचे असते, तेव्हा बऱ्याच बायका त्याच्या नादी लागत नाहीत. कारण नारळ फोडणं हे जरा शक्तीचं काम. त्यामुळे ते मुलांनी किंवा नवऱ्याने करावं, असे बायकांना वाटत असतं. पण नारळ फोडणं हे शक्तीचं नाही, तर युक्तीचं काम आहे बरं का.

 

स्वयंपाक घरात जसे वेगवेगळे पदार्थ करताना किंवा साफसफाई करताना तुम्ही जशा ट्रिक्स वापरता ना, तशाच काही टिक्स नारळातून खोबरं वेगळे करण्यासाठी देखील आहेत. पण आपल्याला त्या माहिती नसतात. पण घरगुती यु ट्यूब चॅनलचा एक मस्त व्हिडियो सध्या व्हायरल झाला आहे. यामध्ये योगिता यांनी खोबऱ्यातून नारळ कसा वेगळा करायचा, याच्या काही सोप्या युक्ती सांगितल्या आहेत. आता लवकरच श्रावण सुरू होणार आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणाने घरात नारळ आणला जाईलच. म्हणूनच तर प्रत्येकीला कामाला येईल, अशा मस्त आयडिया योगिता यांनी सांगितल्या आहेत. 

नारळातून खोबरं वेगळं करण्याच्या सोप्या पद्धती१. पहिली पद्धतसगळ्यात आधी तर नारळाच्या सगळ्या शेंड्या काढून घ्या. ते नारळ एका प्लॅस्टिकच्या कॅरिबॅगमध्ये व्यवस्थित पॅक करा आणि किमान १२ तासांसाठी फ्रिजरमध्ये ठेवून द्या. यानंतर नारळ फ्रिजमधून बाहेर काढा आणि मुसळाने किंवा दगडाने त्याला सगळ्या बाजूंनी हलक्या हाताने ठोकून घ्या. व्यवस्थित ठोकल्या गेल्यानंतर अगदी सहज नारळातून खोबरे वेगळे होईल.

 

२. दुसरी पद्धतनारळाच्या शेंड्या सगळ्या काढून घ्या. नारळाचे तीन छिद्र म्हणजेच बोली भाषेतील तीन डोळे आता स्पष्ट दिसू लागतील. यापैकी एक डोळा जरा मऊ असतो. या डोळ्यात स्क्रु ड्रायव्हर घाला आणि तो डोळा सोलून घ्या. आता त्या सोललेल्या डोळ्यातून सगळे पाणी  काढून घ्या. आता गॅस पेटवा आणि हा नारळ दोन ते तीन मिनिटांसाठी गॅसवर ठेवून भाजून घ्या. दोन- तीन मिनिटांनंतर नारळाला तडा जाऊ लागेल. नारळ एकदा तडकले की ते गॅस बंद करा. नारळ थोडे थंड होऊ द्या आणि त्यानंतर पुन्हा दगडाने किंवा मुसळाने नारळ सगळीकडून हलक्या हाताने ठोकून घ्या. यानंतर अगदी लगेचच टरफल निघू लागेल आणि खोबरे वेगळे होऊ लागेल.

 

क्रेडिट- घरगुती यु ट्यूब चॅनल

३. तिसरी पद्धतनारळाच्या शेंड्या काढल्यानंतर जो डोळा मऊ आहे, तो सोलून त्यातून सगळे पाणी बाहेर काढून घ्या. आता नारळावर ज्या गडद रेषा दिसतात, त्या रेषांवर मुसळ किंवा दगडाच्या साहाय्याने ठोका. यानंतर काही मिनिटांतच नारळाचे दोन समान तुकडे होतील. हे तुकडे प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये टाकून अर्ध्यातासासाठी फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर चाकूच्या साहाय्याने नारळाचे टरफल आणि खोबरे वेगळे करा. अगदी सहजपणे चार ते पाच मिनिटांतच खोबरे वेगळे निघेल. 

४. चौथी पद्धतआधी सांगितल्याप्रमाणे नारळाच्या मऊसर छिद्रातून सगळे पाणी बाहेर काढून घ्या. आता नारळाच्या मधोमध भागात गोलाकार दिशेने पाण्याची एक रेषा काढा. म्हणजेच पाणी लावून घ्या. आता जी पाण्याची रेषा आहे तिच्यावर मुसळ किंवा दगडाच्या साहाय्याने ठोकून घ्या. यानंतर काही मिनिटांतच नारळाचे दोन समान तुकडे होतील. यानंतर आता तुम्ही तिसऱ्या पद्धतीचे तंत्र फॉलो करा आणि नारळापासून खोबरे वेगळे करा. 

 

टॅग्स :अन्नपाककृती