सकाळच्या घाईत नाश्त्याला काय करायचे असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतोच, अशावेळी हमखास 'कांदा-पोहे' तयार केले जातात. पण तेच तेच नेहमीचे पोहे खाऊन जर कंटाळा आला असेल, तर याच पोह्यांचा एक भन्नाट पदार्थ करु शकतो तो म्हणजे 'चटणी पोहे' नाश्ता असा असावा जो पोटभरीचा तर असेलच, पण जो बनवायलाही सोपा असेल अशावेळी हे चटणी पोहे बेस्ट पदार्थ ठरतो. कमी साहित्य आणि गॅसवर फार वेळ न घालवता तयार होणारे हे पोहे चवीला मात्र जबरदस्त लागतात(Chutney Poha Recipe).
नारळ, कोथिंबीर, शेंगदाणे आणि मसाल्यांची खमंग चटणी पोह्यांना एकदम वेगळी चव देते. ऑफिसला उशीर, मुलांची शाळा किंवा अचानक आलेले पाहुणे अशा प्रत्येक प्रसंगात झटपट होणारे चटणी पोहे हमखास सगळ्यांनाचं आवडतात. कोल्हापूर आणि खान्देशात प्रसिद्ध असलेले हे पोहे चवीला झणझणीत आणि दिसायलाही अतिशय आकर्षक असतात. हिरवी मिरची आणि कोथिंबीरची चटणी वापरून तयार केलेले हे पोहे तुमच्या नेहमीच्या पोह्यांची चव विसरायला लावतील. नेहमीच्या पोह्यांपेक्षा वेगळ्या (Green Chutney Poha Recipe) पद्धतीने चटणी पोहे कसे तयार करायचे याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. पोहे - १ कप
२. पाणी - गरजेनुसार
३. ओलं खोबरं - १/२ कप
४. हिरव्या मिरच्या - २ ते ३
५. आलं - १ छोटा तुकडा
६. कोथिंबीर - १ कप
७. तेल - २ ते ३ टेबलस्पून
८. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)
९. चणा डाळ - १/२ टेबलस्पून
१०. पांढरी उडीद डाळ - १ टेबलस्पून
११. मोहरी - १/२ टेबलस्पून
१२. हिंग - चिमूटभर
१३. शेंगदाणे - १/२ कप
१४. मीठ - चवीनुसार
१५. लिंबाचा रस - १/२ टेबलस्पून
मिक्सरमध्ये करा कुळथाची मालवणी पिठी, गिरणीत जाण्याचीही गरज नाही-अस्सल पारंपरिक चवीची पिठी करा घरीच..
प्रेशर कुकरचा स्फोट होण्यापूर्वी हमखास दिसतात ६ लक्षणं, ९०% लोक करतात एक चूक...
कृती :-
१. एका मोठ्या चाळणीत पोहे घेऊन ते पाण्याने व्यवस्थित भिजवून मऊसूत करून घ्यावेत.
२. एका मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा व बारीक चिरलेली कोथिंबीर असे सगळे जिन्नस एकत्रित करून मिक्सरमध्ये वाटून त्याची हिरवीगार चटणी तयार करून घ्यावी. तयार हिरवीगार चटणी भिजवलेल्या पोह्यांवर घालून हलकेच चमच्याने कालवून पोह्यांना चटणी लावून घ्यावी.
कांद्याच्या पातीची भाजी नाही भजी करा, कांदाभजींपेक्षा भारी कुरकुरीत भजी-थंडीत तर खायलाच हवीत!
३. एका भांड्यात तेल घेऊन ते व्यवस्थित गरम करावे. गरम तेलात चणा डाळ, पांढरी उडीद डाळ, मोहरी, चिमूटभर हिंग, शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा घालून खमंग अशी फोडणी तयार करून घ्यावी.
४. या खमंग अशा तयार फोडणीत चटणी लावून घेतलेले पोहे घालावेत. हे पोहे खमंग फोडणीत हलकेच परतवून घ्यावेत.
गरमागरम असे चटणी पोहे खाण्यासाठी तयार आहेत. तयार चटणी पोह्यांवर वरुन आपल्या आवडीप्रमाणे लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर, ओलं खोबरं किंवा डाळिंबाचे दाणे घालून सर्व्ह केल्यास चव अधिकच वाढते. वाफाळत्या चहा सोबत हे चटणी पोहे खाण्याची मज्जा काही औरच असते.
