Join us

लालचुटूक गाजराचा मऊ लुसलशीत पराठा, हिवाळ्यात खावेच असे गरमागरम पराठे, घ्या सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2022 14:59 IST

Carrot Paratha Recipe : आलू पराठा, मेथी पराठा, पनीर पराठा तर नेहमी करता यंदा गाजराचाही पराठा करुन पाहा.

भारतामध्ये नाश्त्याला पोहे, इडली, उपमा यांसोबतच वेगवेगळ्या भाज्यांचे पराठे खाणे पसंत केले जाते. बऱ्याच गृहिणी, घरातील लहान मुलं जर एखादी भाजी खात नसेल तर त्या भाजीला पराठ्यामध्ये स्टफ करून गपचूप त्याला दिली जाते. जेणेकरून त्याला कळणारही नाही आणि त्या भाजीतील पोषक तत्वसुद्धा त्याला त्या पराठ्यातून मिळतील. आलू पराठा, मेथी पराठा, पनीर पराठा असे अनेक पराठ्याचे प्रकार आपण खाल्ले असतील. सध्या हिवाळ्यात बाजारात सगळ्याच भाज्या फ्रेश मिळतात. हिवाळ्यात आपल्याला लाल चुटुक गाजर दिसली की, गाजर हलवा बनवून खाण्याचा मोह होतो. गाजर हलवा केल्यास ज्या व्यक्तींना मधुमेह आहे ते फारसे खाऊ शकत नाहीत. गाजराची कोशिंबीर केली तर घरातील लहान मुलं कोशिंबीरीतील गाजर बाजूला काढून ठेवतात. मग नक्की या गाजरामधील पोषक तत्व आपल्यापर्यंत पोहोचणार कशी? यासाठी केवळ आलू पराठा, मेथी पराठा, पनीर पराठा न बनावता एकदा गाजराचा पराठा बनवून बघा (Carrot Paratha Recipe).

साहित्य - 

१. गव्हाचे पीठ (कणीक) - ४ कप २. गाजर - २३. मीठ - चवीनुसार  ४. तूप - भाजण्यापुरतं ५. कोथिंबीर - २ टेबलस्पून ६. हिरवी मिरची - २ (बारीक चिरलेली)७. कांदा - १ (बारीक चिरलेला)८. तेल - १ टेबलस्पून 

कृती - 

१. गाजर स्वच्छ धुवून बारीक किसून घ्या. २. एका भांड्यात कणीक घेऊन मऊसूत मळून घ्या. 

३. पॅनमध्ये तेल घेऊन त्यात बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला कांदा, किसून घेतलेले गाजर, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे मिश्रण मंद आचेवर शिजवून घ्या. ४. हे मिश्रण शिजवून झाल्यावर एका डिशमध्ये काढून थंड करून घ्या. 

५. कणकेचा एक गोळा घेऊन त्यात हे गाजराचे स्टफिंग भरून घ्या. ६. गाजराचे स्टफिंग भरून घेतलेला गोळा हलकेच लाटून घ्या. ७. तव्यावर तूप सोडून हा गाजराचा पराठा खरपूस भाजून घ्या.

तुमचा गाजराचा पराठा खाण्यासाठी तयार आहे. टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत हा पराठा सर्व्ह करा.

टॅग्स :अन्नपाककृती